स्क्रीन तुमच्या आयुष्यातला व्हिलन आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 09:08 AM2021-03-11T09:08:11+5:302021-03-11T09:08:27+5:30
संध्याकाळी घरी आल्यावर विरंगुळा हवा म्हणूनही स्क्रीन्स लागतातच !
हल्ली सकाळी उठल्या उठल्या अंथरूणातून बाहेर पडण्याच्याही आधी पहिली गोष्ट तुम्ही काय करता?- अर्थात, फोनवर नजर टाकता. रिमांइण्डर्स असतात, मेसेजेस बघावे लागतात, व्हॉट्सॲपवर शेकडो ग्रुप्स असतात, शिवाय फेसबुक आणि इन्स्टाग्रामचं फीड बघायचं असतं ते वेगळंच. हे फक्त सकाळीच नव्हे, दिवसभर चालूच राहातं. शिवाय सकाळी सगळं आवरून ऑफिस सुरू झालं की कामाचा स्क्रीन डोळ्यासमोर येतो. फोन्स सुरू होतात. मग दिवसभर तो रगाडा चालतो. हातातला छोटा स्क्रीन, समोर कामाचा मोठा स्क्रीन..
संध्याकाळी घरी आल्यावर विरंगुळा हवा म्हणूनही स्क्रीन्स लागतातच ! आधी टीव्ही होता, व्हिडिओ गेम्स होते, आता ओटीटी आलंय त्यात भर म्हणून! एकुणातच आपण जागे असतो, त्यातला बराच काळ या स्क्रीन्सच्या गुलामगिरीला जुंपलेलो असतो, हे सध्या सगळ्यांनाच जाणवतं आहे. नुसतं जाणवतंच काय, आता तर ते टोचायलाही लागलं आहे. आपण सतत स्क्रीनसमोर असतो, फोन सोबत नसेल, डिस्चार्ज झाला असेल, घरातलं वायफाय डाऊन असेल तर आपल्याला सहन होऊ नये अशी अस्वस्थता येते, हेसुद्धा आता अनेकांच्या लक्षात यायला लागलं आहे आणि हे योग्य नव्हे याची जाणिवही नाही म्हटलं तरी मन कुरतडतेच आहे की!
महत्त्वाचं म्हणजे सध्या आपलं बाकी कशात लक्ष लागत नाही. मित्रमैत्रिणींबरोबर गप्पांचे कट्टे रंगायचे पूर्वी. आता त्या कट्ट्यावरही मोबाइल हा व्हिलन झाला आहे. घरात एकमेकांच्या समोर बसलेली माणसं एकमेकांच्या हातातल्या स्क्रीनमध्ये डोकं खुपसून जी व्यक्ती आता तिथे नाही तिच्याशी व्हर्च्युअली बोलण्यात दंग आहेत, अशी कार्टून्स पूर्वी यायची; पण आता व्यंगचित्रकारांनाही त्यात काही गंमत दिसत नाही कारण पूर्वीचं व्यंग आता वास्तव होऊन बसलं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी जगभरच्या मनोरंजनाचा एवढा धबधबा आणून घरात ओतणं सुरू केलंय की आपण सगळे वाहूनच गेलो आहोत त्यात!
खूप दिवसात आपण प्रिय माणसाबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या नाहीत, खूप दिवसात झपाटल्यासारखं एखादं पुस्तक दोन रात्रीत संपवलं नाही, स्वत:शीच एकटे निवांत बसलो नाही, याची हुरहुर लागलीय का तुम्हाला? तर मग तुम्ही एका व्यसनात अडकला आहात. डिजिटल व्यसन!.. आणि तुम्हाला डिजिटल डिटॉक्सची फार गरज आहे. म्हणजे काय? त्यासाठी काय करावं लागेल? - त्याबद्दल पुढच्या गुरुवारपासून, इथेच, याच पानावर!