Server Down: अखेर ६ तासांनी Facebook, WhatsApp, Instagram सेवा पुन्हा सुरू; कंपनीनं मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 05:32 AM2021-10-05T05:32:06+5:302021-10-05T05:34:13+5:30
भारतीय वेळेनुसार, मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र Facebook, Instagram, आणि WhatsApp सर्वर डाऊन का झाला हे अजून स्पष्ट झालं नाही.
मुंबई - व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर पुन्हा सुरू झालं आहे. गेल्या ६ तासांपासून सोशल मीडिया सर्वर तांत्रिक अडचणींमुळे बंद पडलं होतं. त्यामुळे युजर्स चिंतेत होते. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स ऍप का बंद पडलं त्याबाबत अद्याप कुठलंही कारण समोर आलं नाही. काही लोकांनी यामागे सायबर हल्ला असल्याची शक्यता वर्तवली आहे. भारतासह जगभरात सहा तासाहून अधिक काळ ही सेवा बंद होती. आता तात्पुरत्या स्वरुपात पुन्हा सेवा सुरू झाल्याची माहिती न्यूज एजेंन्सी रॉयटर्सनं दिली आहे.
भारतीय वेळेनुसार, मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र Facebook, Instagram, आणि WhatsApp सर्वर डाऊन का झाला हे अजून स्पष्ट झालं नाही. काही जणांच्या मते या सर्वरचं डीएनएस खराब झाल्याने सेवा बंद झाल्याचं बोललं जात आहे. DNS हा इंटरनेटचा कणा मानला जातो. तुम्ही जेव्हा तुमच्या मोबाईलवर अथवा कॉम्प्युटरवर वेबसाईट ओपन करता तेव्हा DNS तुमच्या ब्राऊजरला कुठल्याही वेबसाईटचा आयपी काय आहे हे सांगतो. प्रत्येक वेबसाईटचा एक आयपी असतो. ट्विटर, फेसबुक प्रकरणात DNS तुमच्या ब्राऊजरला ट्विटर, फेसबुकचा आयपी काय आहे ते सांगतो. अशावेळी फेसबुक, ट्विटरचा रेकॉर्ड असलेला DNS डेटाबेसमधून काढून टाकला जातो. तेव्हा तुम्ही फेसबुक, ट्विटर एक्सेस करू शकत नाही.
To the huge community of people and businesses around the world who depend on us: we're sorry. We’ve been working hard to restore access to our apps and services and are happy to report they are coming back online now. Thank you for bearing with us.
— Facebook (@Facebook) October 4, 2021
सोमवारी रात्री जगभरातील फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्स ऍप अचानक डाऊन झालं होतं. रात्री ९.१५ च्या आसपास तिन्ही सर्वर डाऊन झाल्याने युजर्सला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. जवळपास सहा तासांनी युजर्सला ही सेवा पुन्हा वापरता येत आहे. पहाटे ४ च्या सुमारास फेसबुकनं या सेवा पुन्हा बहाल केल्याचं ट्विट केले. त्याचसोबत युजर्सची गैरसोय झाली त्याबद्दल कंपनीनं माफी मागितली आहे. आउटेजच्या या समस्येमुळे लोकांना कुणालाही मेसेज पाठवता येत नव्हता किंवा कुणाचाही मेसेज पोहचत नव्हता.
व्हॉट्स ऍपच्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, हळूहळू सेवा पुर्ववत होत असून आम्ही पूर्ण सतर्कतेने या दिशेला जात आहोत. इतका वेळ युजर्सला व्हॉट्स ऍप वापरता आलं नाही त्याबद्दल क्षमा मागतो. सर्वर डाऊन झाल्याबद्दल जी काही कारणं समोर येतील ते तुमच्यापर्यंत पोहचवली जातील. काही लोकांकडून आम्हाला ही सेवा काम करत नसल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर आम्ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत असं सांगण्यात आले आहे.
Apologies to everyone who hasn’t been able to use WhatsApp today. We’re starting to slowly and carefully get WhatsApp working again.
— WhatsApp (@WhatsApp) October 4, 2021
Thank you so much for your patience. We will continue to keep you updated when we have more information to share.