शाओमी मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ बाजारात दाखल
By शेखर पाटील | Published: September 27, 2017 02:52 PM2017-09-27T14:52:15+5:302017-09-27T14:56:30+5:30
शाओमी कंपनीने आपले मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ हे मॉडेल आधी लाँच करण्यात आलेल्या मी ब्ल्युटुथ स्पीकरची सुधारित आवृत्ती आहे
शाओमी कंपनीने आपले मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ हे मॉडेल आधी लाँच करण्यात आलेल्या मी ब्ल्युटुथ स्पीकरची सुधारित आवृत्ती आहे. याचे मूल्य २,६९९ रूपये असले तरी ग्राहकांना सध्या हा स्पीकर १,७९९ रूपये या विशेष सवलतीच्या मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे. शाओमी इंडियाचे प्रमुख मनूकुमार जैन यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. हा स्पीकर ब्ल्युटुथ ४.२ या प्रणालीच्या मदतीने सुमारे दहा मीटर अंतरापर्यंतच्या उपकरणांना कनेक्ट करणारा आहे. यात ए२डीपी, एव्हीआरसीपी आणि एचएफपी या ध्वनी मानकांवर आधारित स्ट्रीमिंगचा आनंद घेता येणार आहे.
शाओमी मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ याची डिझाईन अतिशय आकर्षक अशी आहे. क्युबिकल आकाराच्या या मॉडेलला अॅल्युमिनीयम फ्रेम प्रदान करण्यात आली आहे. अवघे २३७ ग्रॅम इतके वजन असणार्या या मॉडेलमध्ये दोन स्पीकर आणि रिसीव्हर देण्यात आला आहे. अँड्रॉइड आणि आयओएस अॅप्लीकेशनच्या मदतीने हा स्पीकर स्मार्टफोनला कनेक्ट करता येतो. अर्थात स्मार्टफोनसह अन्य उपकरणांमधील संगीताचा यावर आनंद घेता येतो. यावरून कॉल करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यासाठी यात इनबिल्ट मायक्रोफोनही दिलेला आहे.
शाओमी मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ या मॉडेलमध्ये १,२०० मिलीअँपिअर क्षमतेची लिथियम-पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल दहा तासांपर्यंत हा स्पीकर वापरता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. ब्ल्युटुथसह यात मायक्रो-युएसबी आणि ऑक्झ-इन पोर्ट हे कनेक्टिव्हिटीचे पर्याय देण्यात आले आहेत. याच्या मदतीने संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, संगीत प्रणाली, एमपीथ्री प्लेअर आदी उपकरणे याला सहजपणे संलग्न करता येतात.