शाओमी मी बँड ३ फिटनेस ट्रॅकरचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:04 PM2018-06-04T13:04:31+5:302018-06-04T13:04:31+5:30
शाओमी कंपनीने अद्ययावत फिचर्सने सज्ज असणार्या मी बँड ३ या फिटनेस ट्रॅकरला जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा
मुंबई - शाओमी कंपनीने अद्ययावत फिचर्सने सज्ज असणार्या मी बँड ३ या फिटनेस ट्रॅकरला जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. शाओमी कंपनीच्या नुकत्याच झालेल्या ग्लोबल लाँच कार्यक्रमात मी बँड ३ या मॉडेलचे अनावरण करण्यात आले. हे मॉडेल शाओमी मी बँड २ या फिटनेस ट्रॅकरची पुढील आवृत्ती आहे. यात आधीपेक्षा अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे बॅटरी होय. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २० दिवसांपर्यंत चालणार असल्याचे शाओमी कंपनीने नमूद केले आहे. याशिवाय याला पाण्याखाली तब्बल ५० मीटर अंतरापर्यंत वापरता येणार आहे. यामध्ये ०.७८ इंच आकारमानाचा आणि १२८ बाय ८० पिक्सल्स क्षमतेचा ओएलईडी या प्रकारातील डिस्प्ले वापरण्यात आला आहे. यामधील एका स्वतंत्र व्हेरियंटमध्ये एनएफसीचा सपोर्टदेखील देण्यात आला आहे. याच्या मदतीने कुणीही युजर पैशांची देवाण-घेवाणही करू शकतो. अन्य फिटनेस ट्रॅकरमध्ये असणार्या सर्व सुविधा शाओमी मी बँड ३ या मॉडेलमध्ये आहेत. तर आधीच्या मॉडेलमध्ये नसणारी हार्ट रेट मॉनिटरची सुविधादेखील यात दिलेली आहे. याला अँड्रॉइड व आयओएस प्रणालीवर चालणारा स्मार्टफोन कनेक्ट करता येणार असून यासाठी स्वतंत्र अॅप लाँच करण्यात आले आहे. याला संलग्न करण्यात आलेल्या स्मार्टफोनवरील नोटिफिकेशन्स याच्या डिस्प्लेवर पाहता येणार आहे.