शाओमी मी ए१ स्मार्टफोनची रोझ गोल्ड आवृत्ती लवकरच दाखल होणार
By शेखर पाटील | Published: November 21, 2017 11:49 AM2017-11-21T11:49:28+5:302017-11-21T11:52:25+5:30
शाओमी कंपनीने आपल्या मी ए१ या स्मार्टफोनची रोझ गोल्ड ही नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.
शाओमी कंपनीने आपल्या मी ए१ या स्मार्टफोनची रोझ गोल्ड ही नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.
शाओमी मी ए १ हे मॉडेल भारतात ५ सप्टेबर रोजी लाँच करण्यात आले होते. प्रारंभी हा स्मार्टफोन ब्लॅक आणि गोल्ड या रंगाच्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आला होता. आता याची रोझ गोल्ड या रंगातील आवृत्ती लाँच करण्यात आली आहे. शाओमी मी ए १ हे मॉडेल भारतीय ग्राहकांना मूळ मॉडेलप्रमाणेच १४,९९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आला असून याला कंपनीच्या मी.कॉम या संकेतस्थळासह फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी याचा पहिला सेल आहे.
शाओमी मी १ हे मॉडेल अँड्रॉइड वन या प्रणालीवर चालणारे आहे. गुगलने अँड्रॉइड वन या प्रणालीच्या अंतर्गत किफायतशीर दरातील स्मार्टफोन्सला आपल्या ऑपरेटींग सिस्टीमच्या अद्ययावत आवृत्तीचा वापर करण्याचे सुविधा प्रदान केलेली आहे. म्हणजेच शाओमी मी ए १ हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून याला ओरिओ या आवृत्तीचे अपडेट लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. या मॉडेलमधील दुसरे विशेष फिचर म्हणजे यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे आहेत. यातील एकाला टेलिफोटो लेन्स तर दुसर्याला वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. यात बोके इफेक्टची सुविधा देण्यात आली आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असेल.
शाओमी मी ए १ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १०८० बाय १९२० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते ३०० जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील असेल. तर कनेक्टीव्हिटीसाठी फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.