अलर्ट! एक छोटेसं सिम कार्ड पडू शकतं चांगलंच महागात; तुम्हाला पाठवेल थेट तुरुंगात कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 06:23 PM2022-03-29T18:23:13+5:302022-03-29T18:24:55+5:30
Sim Card Fraud : सिम कार्डचा वापर करताना नेमकी कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊया...
नवी दिल्ली - आपण सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये सिम कार्ड वापरतो कारण त्याशिवाय मोबाईल निरुपयोगी आहे. एक छोटेसं सिम कार्ड चांगलंच महागात पडू शकतं. थेट तुरुंगात पाठवू शकतं. त्यामुळे अत्यंत सावध असणं गरजेचं आहे. सिम कार्डचा वापर करताना नेमकी कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊया...
होऊ शकते फसवणूक
सिम कार्डच्या चुकीच्या वापरामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, तुमचे सिम कार्ड कधीही चुकीच्या व्यक्तीच्या हाती जाता कामा नये. यामुळे तुमचे मोठं नुकसान होऊ शकते. समोरच्या व्यक्तीने तुमच्या सिमकार्डने काही फसवणूक केली किंवा त्याचा कोणत्याही प्रकारे गैरवापर केला तर, त्यासाठी तुम्हाला तुरुंगात टाकले जाऊ शकते. तसेच, तुमचे सिम कार्ड हरवले तर लगेच नंबर बंद करा. अन्यथा, सिम कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरल्यास तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
मिळू शकते धमकी
सिम कार्डमुळे धमकी देण्यासारखे सारखे प्रकार घडू शकतात. जर तुमचे सिम कार्ड एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडले आणि समोरच्या व्यक्तीने तुमच्या नंबरवरून दुसऱ्या व्यक्तीला कॉल करून त्या व्यक्तीला धमकी दिली. तर अशा परिस्थितीत तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की, तुमच्याकडे जास्ती सिम कार्ड असले तरीही, तुमच्या अगदी व्यक्तींना सुद्धा तुमचे सिम कार्ड देऊ नका. असे केल्यास कधी-कधी दुसऱ्या व्यक्तीमुळे तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
सिम कार्ड स्वॅप
हल्ली सिम कार्ड स्वॅपिंगचा वापर करून अनेक गैरव्यवहार होत असल्याचं समोर येत आहे. सिम कार्ड स्वॅपिंगमुळेही तुमचं नुकसान होऊ शकतं. सिम कार्ड स्वॅपिंग म्हणजे सिम कार्ड बदलणे. आजकाल, हे फसवणुकीचं एक नवीन साधन बनले आहे, जे आपल्या नकळत घडते. फसवणूक करणारे त्याच नंबरचे दुसरे सिम कार्ड जारी करतात. त्यानंतर OTP / Details टाकून तुमच्या बँक खात्यातील संपूर्ण पैसे ते चुकीच्या पद्धतीने मिळवू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.