एका अक्षराच्या चुकीने 81 वर्षांच्या वयोवृद्धाला पोहोचवले 1400 किमी दूर; तुमच्याकडूनही होऊ शकते अशी चूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 03:24 PM2019-06-25T15:24:55+5:302019-06-25T15:28:32+5:30
'जाना था जापान,पहुंच गए चीन...' सारखा किस्सा घडला आहे.
बर्लिन : काहीवेळा एखादी छोटीशी चूकही मोठी समस्या उभी करू शकते. अशीच एक चूक एका 81 वर्षांच्या वृद्धाने केली आणि ते तब्बल 1400 किमी दूर जाऊन पोहोचले. याबाबत त्यांना माहिती होईपर्यंत खूप उशीर झाला होता. सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांची ही चूक केवळ एका अक्षराची होती. ही चूक तुमच्या-आमच्याकडूनही होऊ शकते.
ही गोष्ट एका बर्लिनच्या 81 वर्षांच्या वयोवृद्धाची आहे. त्यांना फिरण्याची मोठी हौस आहे. मात्र त्यांच्याबाबतील 'जाना था जापान,पहुंच गए चीन...' सारखा किस्सा घडला आहे. या वृद्धाला पोपना भेटण्यासाठी जायचे होते. त्यांना पोपना भेटायची इच्छा झाली होती. त्यांची जग्वार कार घेऊन रोमकडे निघाले.
रोमला जाण्यासाठी त्यांनी नेव्हिगेशनवर पत्ता टाकला आणि त्यावर विश्वास ठेवून आरामात कार चालवत गेले. मोठ्या प्रवासानंतर नेव्हिगेशन अॅपने सांगितले की ते त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले आहेत. पोपना भेटण्यासाठी ते खूप उत्साहित होते. मात्र, तेथे ना त्यांना पोप मिळाले नाही व्हेटिकेशन सिटी. यामुळे हे वृद्ध खूप त्रस्त झाले. आजुबाजुला विचारणा केली तर तिथे कोणीच पोप राहत नसल्याचे समजले. काही लोकांना व्हेटिकेशन सिटीबाबतही माहिती नव्हती. मात्र, त्यांना या लोकांनी रोममध्येच आल्याचे सांगितले. यामुळे हा वृद्ध व्यक्ती आणखी त्रस्त झाला. पण त्यांची चूक लक्षातच येत नव्हती.
बराचवेळ लोकांशी बोलल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते ज्या रोममध्ये पोहोचले आहेत ते पश्चिम जर्मनीतील वेस्टफेलियातील शहर ROM मध्ये आले आहेत. त्यांना रोमलाच जायचे होते. मात्र, त्या रोमचे स्पेलिंग ROME होते. आणि ते या शहरापासून तब्बल 1400 किमी लांब होते. एका E या अक्षराने सारा घोळ झाला. यामुळे जर तंत्रज्ञानाचा वापर हुशारीने केला नाही तर आपलीही असी फसगत होण्याची दाट शक्यता असते. बऱ्याचदा आपल्यासोबतही असेच किस्से झालेलेही असतील कारण महाराष्ट्रात किंवा भारतात एकाच नावाची अनेक गावे आहेत. यामुळे एकदा खात्री करूनच मॅपवरील प्रवासाला सुरूवात करावी.