स्काईप अॅपचे अपडेट सादर : नवीन फिचर्सचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 04:30 PM2018-07-20T16:30:30+5:302018-07-20T16:31:51+5:30
स्काईप सेवेच्या डेस्कटॉप अॅपची नवीन आवृत्ती सादर करण्यात आली असून याच्या माध्यमातून युजर्सला अनेक नवीन फिचर्सचा लाभ देण्यात आला आहे.
स्काईप सेवेच्या डेस्कटॉप अॅपची नवीन आवृत्ती सादर करण्यात आली असून याच्या माध्यमातून युजर्सला अनेक नवीन फिचर्सचा लाभ देण्यात आला आहे.
स्काईप सेवेचा संगणकावरून लाभ घेणार्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. अर्थात याच्या डेस्कटॉप अॅपचा वापरदेखील खूप होत असतो. या अनुषंगाने या अॅपचे ताजे अपडेट सादर करण्यात आले आहे. ही स्काईपची आठवी आवृत्ती असणार आहे. यात आधीच्या अर्थात सातव्या आवृत्तीपेक्षा काही नवीन सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यामध्ये एचडी व्हिडीओ कॉलींगची सुविधा देण्यात आलेली आहे. अर्थात आता युजर यावरून हाय डेफीनेशन क्वॉलिटीचे कॉल्स करू शकणार आहे. यामध्ये ‘इन-कॉल स्क्रीन शेअरिंग’ हे स्वतंत्र फिचरदेखील असणार आहे. यात कुणीही युजर ‘@’ या चिन्हाने समोरच्या युजरसोबत आपला स्क्रीन शेअर करू शकतो. एकाच वेळी २४ युजर्ससोबत या प्रकारचे शेअरिंग करता येणार आहे. संभाषणाच्या दरम्यान युजर ३०० मेगाबाईटपर्यंतच्या विविध फाईल्स, व्हिडीओज, प्रतिमा आदींनाही शेअर करू शकेल. यासाठी यामध्ये नवीन मीडिया गॅलरीदेखील देण्यात आलेली आहे. यावर क्लिक करून कुणीही या गॅलरीतील विविध फाईल्सला पाहू शकतो.
दरम्यान, स्काईपवर बहुप्रतिक्षित असणारे कॉल रेकॉर्डींगचे फिचरदेखील युजरला लवकरच मिळणार आहे. ही क्लाऊडवर आधारित सेवा असण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नसली तरी येत्या काही दिवसांमध्ये याला वापरण्याची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. स्काईपच्या माध्यमातून करण्यात येणारा संवाद हा सुरक्षित मानला जातो. तथापि, याला अद्यापदेखील ‘एंडी-टू-एंड एनक्रीप्शन’चे सुरक्षा कवच मिळालेले नाही. येत्या कालखंडात याबाबतही घोषणा होऊ शकते.