स्मार्टफोनला बनवा मायक्रोस्कोप
By शेखर पाटील | Published: February 27, 2018 01:08 PM2018-02-27T13:08:40+5:302018-02-27T13:08:40+5:30
तंत्रज्ञांनी आता थ्री-डी प्रिंटींग करून एक क्लिप तयार केली असून याच्या मदतीने कोणत्याही स्मार्टफोनला मायक्रोस्कोप या उपकरणामध्ये परिवर्तीत करता येते.
तंत्रज्ञांनी आता थ्री-डी प्रिंटींग करून एक क्लिप तयार केली असून याच्या मदतीने कोणत्याही स्मार्टफोनला मायक्रोस्कोप या उपकरणामध्ये परिवर्तीत करता येते.
स्मार्टफोनला मायक्रोस्कोप करण्याचे प्रयत्न आधीदेखील झाले आहेत. तथापि, ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञांच्या एका चमूने ही प्रक्रिया अतिशय सुलभ केली आहे. अॅडलेड विद्यापीठातील एआरसी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नॅनोस्केल बायोफोटोनिक्सच्या पथकाने थ्री-डी प्रिंटींगच्या मदतीने एक क्लिक तयार केली आहे. यात अतिशय उत्तम दर्जाचे भिंग लावण्यात आले आहे. ही क्लिप अगदी सहजपणे स्मार्टफोनच्या मागील बाजूस कनेक्ट करता येते. यानंतर या स्मार्टफोनच्या कॅमेर्यातून मायक्रोस्कोप या उपकरणाप्रमाणेच सूक्ष्म वस्तू अगदी सहजपणे पाहता येतात. याच्या मदतीने एक मिलीमीटरच्या २००व्या भागापर्यंतचे सूक्ष्म जीव, पार्टीकल्स आदींना पाहता येते. यात रक्तपेशी, विविध जंतूंच्या पेशी, वनस्पती व प्राणी पेशी आदींचाही समावेश आहे. हे मायक्रोस्कोप विविध कामांमध्ये उपयुक्त ठरू शकते. यात पाण्यातील प्रदूषणासह विविध रोगांच्या निदानाबाबतची माहिती मिळू शकते. अनेक दुर्गम भागांमध्ये मायक्रोस्कोप सहजासहजी उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमिवर, हे तंत्रज्ञान वरदान सिध्द होऊ शकते. येत्या काही महिन्यांमध्ये ही क्लिप व्यावसायीक पातळीवर उपलब्ध करण्यात येणार आहे.