स्मार्टफाेन कंपनी भारतात देणार एक लाखाहून अधिक नाेकऱ्या; ७०० दशलक्ष डॉलर्सची करणार गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 07:30 AM2023-03-04T07:30:10+5:302023-03-04T07:30:26+5:30
चीनमधून बाहेर पडण्याची योजना २०१७ पासून भारतात आयफाेनचे उत्पादन सुरू केले हाेते. फाॅक्सकाॅन, विस्ट्राॅन आणि पेगाट्राॅन हे त्यासाठी ॲपलचे भारतातील भागीदार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढत चालल्यामुळे ॲपलने आपले प्रकल्प चीनबाहेर हलविण्याची योजना आखली असून त्याच योजनेंतर्गत फॉक्सकॉन भारतात येत आहे. ‘ॲपल’चा भागीदार असलेला फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी समूह भारतात ७०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. बंगळूरू येथे मोठा प्रकल्प उभारणार असून त्याद्वारे १ लाखांहून अधिक लोकांना नोकऱ्याही मिळणार आहेत.
सूत्रांनी सांगितले की, ‘हॉन हाई प्रिसिजन इंडस्ट्रीज कंपनी’ या आपल्या फ्लॅगशिप प्रकल्पामुळे ओळखली जाणारी ‘फॉक्सकॉन’ बंगळुरू विमानतळाजवळ ३०० एकरवर आयफोन निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पात ॲपलच्या हँडसेटची जुळवणी केली जाणार आहे तसेच इलेक्ट्रिक वाहनांचे सुटे भाग बनविण्यासाठीही प्रकल्पाचा उपयोग केला जाणार आहे.
चीनमधून बाहेर का?
n हा ‘फॉक्सकॉन’चा भारतातील सर्वांत मोठा एकल प्रकल्प ठरणार आहे. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सचा जगातील सर्वांत मोठा उत्पादक चीनचा किताब ‘फॉक्सकॉन’च्या स्थलांतरामुळे धोक्यात येऊ शकतो.
n या प्रकल्पात १ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. चीनच्या झेंगझोऊ येथील फॉक्सकॉन प्रकल्पात २ लाख लोक काम करतात.
n कोविड-१९ साथीमुळे तेथील उत्पादन घटले आहे. त्यामुळे ॲपलने चीनबाहेर निर्मिती प्रकल्प वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
भारतात २०१७ पासून आयफाेनचे उत्पादन
ॲपलने २०१७ पासून भारतात आयफाेनचे उत्पादन सुरू केले हाेते. फाॅक्सकाॅन, विस्ट्राॅन आणि पेगाट्राॅन हे त्यासाठी ॲपलचे भारतातील भागीदार आहेत. त्यांना सरकारच्या पीएलआय याेजनेचाही लाभ मिळत आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये तब्बल १ अब्ज डाॅलर्स एवढ्या मूल्याचे आयफाेन भारतातून निर्यात झाले हाेते. स्मार्टफाेन निर्यातीचा हा उच्चांक हाेता. भारतातून सर्वच स्मार्टफाेनची निर्यात सातत्याने वाढत आहे.
चीनमध्ये उत्पादनावर भर का हाेता?
चीनमध्ये स्वस्त कामगार हा एकच मुद्दा नाही तर स्मार्टफाेन जुळवणीसाठी आवश्यक असणारे काैशल्य असलेले मनुष्यबळ व तंत्रज्ञान चीनमध्ये उपलब्ध आहे. ते अमेरिकेतही नाही, असे ॲपलचे सीईओ टीम कुक यांनी सांगितले हाेते.