स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या गोपनीय माहितीची चोरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 05:02 AM2019-07-13T05:02:56+5:302019-07-13T05:03:01+5:30
अँण्ड्रॉइड अॅप बेकायदेशीररीत्या मिळवितात वापरकर्त्यांचा डेटा
नवी दिल्ली : आपली कोणती माहिती अॅण्ड्रॉइड अॅपसोबत सामायिक करायची किंवा नाकारायची हा पर्याय वापरकर्त्यांना उपलब्ध असला तरी हजारो अॅण्ड्रॉइड अॅप परवानगी नसतानाही वापरकर्त्यांचा डेटा परस्पर चोरत असल्याचे समोर आले आहे.
इंटरनॅशनल कॉम्प्युटर सायन्स इन्स्टिट्यूट या संस्थेने हा अभ्यास केला. अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशनच्या वैयक्तिक गोपनीयता विभागाकडे मागील महिन्यात संस्थेने आपला अहवाल सादर केला. अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा पर्दाफाश केला आहे.
गुगल प्ले स्टोअरवरील ८८ हजार अॅण्ड्रॉइड अॅपचा अभ्यास संस्थेने केला. यातील १,३२५ अॅप खासगी डेटा संपर्क परवानगी नसतानाही आडमार्गाने मिळवीत असल्याचे आढळून आले. हे चोरटे अॅप वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनवरील अशा अॅपशी संधान बांधतात ज्यांना डेटा संपर्काची परवानगी आहे. परवानगी प्राप्त अॅपला जो गोपनीय डेटा उपलब्ध होतो, तो सर्व डेटा प्रतिबंधित अॅपलाही या मार्गाने उपलब्ध होतो. प्रतिबंधित माहिती चोरण्यासाठी अॅपमध्ये असलेल्या कॉमन एसडीके (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कीट) लायब्ररीचा वापर केला जातो.
क्विक हिल टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर म्हणाले की, स्मार्टफोनमधील एखादे अॅप चोरटे एसडीके वापरत आहे का, हे कळण्याचा कोणताही मार्ग सामान्य वापरकर्त्यांकडे उपलब्ध नाही.
अशी मिळवली जाते युजरची माहिती
फोनधारकाने लोकेशन सामायिक केलेले नसले तरी थर्डपार्टी लायब्ररीज असलेले अॅप हे लोकेशन मिळवून साठवून ठेवते. ही माहिती हस्तांतरितही होते. अनेक अॅप स्मार्टफोनची ओळख असलेला आयएमईआय क्रमांक, वापरकर्त्याचा ई-मेल आयडी आणि फोन क्रमांकही मिळवितात.
फोटोमधील जीओ टॅगिंगच्या माध्यमातून ते जीपीएस समन्वयही प्रस्थापित करतात. त्यातून वापरकर्त्याचे लोकेशन अॅपला सतत मिळत राहते. ही माहिती विश्लेषित करून वापरकर्त्याच्या आवडीनिवडीनुसार त्याला जाहिराती पाठविल्या जातात.