बॅड न्यूज! पुन्हा एकदा वाढू शकतात स्मार्टफोन्सच्या किंमती; या कारणांमुळे होऊ शकते 10 टक्के भाववाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 18:04 IST2021-09-18T18:04:35+5:302021-09-18T18:04:44+5:30
कच्च्या मालाच्या आयतीमध्ये समस्या येत असल्यामुळे गेल्या सहा महिन्यात मोबाईल्सच्या किंमती वाढवल्या जात आहेत.

बॅड न्यूज! पुन्हा एकदा वाढू शकतात स्मार्टफोन्सच्या किंमती; या कारणांमुळे होऊ शकते 10 टक्के भाववाढ
गेले काही महिने देशातील स्मार्टफोन कंपन्या आपल्या मोबाईल्सच्या किंमती वाढवत आहेत. या महागाईतून दिलासा मिळण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत कारण भारतीय स्मार्टफोन ग्राहकांना अजून एक झटका लागणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या काही महिन्यात ग्राहकांना नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जास्त किंमत द्यावी लागेल. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आता फोन विकत घेणे फायदेशीर ठरू शकतो.
समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी सणासुदीच्या काळात स्मार्टफोन कंपन्या सध्या उपलब्ध असलेल्या फोन्सच्या किंमती 7 ते 10 टक्क्यांनी वाढवू शकतात. सध्या जरी बरेचशे फोन्स भारतात बनत असले तरी कच्चा माल अजूनही चीनमधून येत आहे. या कच्च्या मालाच्या आयतीमध्ये समस्या येत असल्यामुळे गेल्या सहा महिन्यात मोबाईल्सच्या किंमती वाढवल्या जात आहेत.
कोरोना महामारीमुळे घरून काम करणाऱ्यांचे आणि ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्मार्टफोन्स, टॅबलेट आणि लॅपटॉप्सच्या मागणीत वाढ झाली आहे. हे डिवाइस बनवण्यासाठी लागणाऱ्या कंपोनंट्सच्या किंमती चीनमध्ये वाढल्या आहेत. तसेच काही कंपोनंटस बाजारात उपलब्ध देखील होत नाहीत. या सर्वांचा दबाव गॅजेट्स निर्माता कंपन्यांवर पडत आहे. त्यामुळे मागणी जास्त असूनही सणासुदीच्या काळात स्मार्टफोन कंपन्या आपल्या जुन्या तसेच नव्या स्मार्टफोन्सचे भाव वाढवू शकतात.