स्मार्टरॉनचे टु-इन-वन लॅपटॉप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 12:39 PM2018-05-07T12:39:59+5:302018-05-07T12:39:59+5:30
स्मार्टरॉन कंपनीने आपल्या टी.बुक फ्लेक्स हे मॉडेल सादर केले असून ते टु-इन-वन म्हणजेच लॅपटॉपसह टॅबलेट म्हणूनही वापरता येणार आहे.
स्मार्टरॉन कंपनीने टी.बुक फ्लेक्स या नावाने आपले नवीन मॉडेल बाजारपेठेत सादर केले आहे. याला कोअर आय३, आणि कोअर आय५ या दोन प्रोसेसरच्या व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आलेले आहे. यांचे मूल्य अनुक्रमे ४२,९९० आणि ५२,९९० रूपये असून ते १३ मे पासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करण्यात आले आहे. याच्या स्टायलस पेनचा सपोर्ट दिलेला असून यासोबत स्टँडदेखील मिळणार आहे. वर नमूद केल्यानुसार हे मॉडेल टु-इन-वन या प्रकारातील आहे. यामुळे याचा किबोर्ट काढल्यानंतर हे मॉडेल टॅबलेट म्हणूनही वापरता येणार आहे. यामध्ये अॅल्युमिनीयम आणि मॅग्नेशियमपासून तयार केलेली मजबूत बॉडी आहे. तर हे मॉडेल ग्राहकांना ऑरेंज/ग्रे आणि ब्लॅक/ग्रे या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
स्मार्टरॉन टी.बुक फ्लेक्स या मॉडेलमध्ये १२.२ इंच आकारमानाचा आणि डब्ल्यूक्यूएक्सजीए म्हणजे २५६० बाय १६०० पिक्सल्स क्षमतेचा मल्टीटच या प्रकारातील आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर ओडिओफोबीक लेअर प्रदान करण्यात आला आहे. वर नमूद केल्यानुसार याच्या दोन्ही व्हेरियंटमध्ये सातव्या पिढीतील कोअर आय-३ आणि आय-५ हे प्रोसेसर दिलेले आहेत. याची रॅम ४ जीबी असून याला एचडी ग्राफीक्स ६१५ प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे. याचे स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा आहे. याच्या मागील बाजूस ऑटो-फोकस या फिचरने सज्ज असणारा ५ मेगापिक्सल्सचा तर पुढील बाजूस २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यात युएसबी ३.०, युएसबी टाईप-सी, थंडरबोल्ट, युएसबी २.० आदी पोर्ट दिलेले आहेत. यासोबत कार्ड रीडर, हेडफोन जॅक आणि एक्सटर्नल किबोर्डसाठी स्वतंत्र पीनही दिलेली आहे. तसेच यात वाय-फाय, वाय-फाय डायरेक्ट आणि ब्ल्यु-टुथचा सपोर्टदेखील दिलेला आहे. यात ४० वॅट क्षमतेची बॅटरी असून ती उत्तम बॅकअप देण्यास सक्षम आहे. तर हे मॉडेल विंडोज १० या प्रणालीवर चालणारे असेल.