मनगटावरील Smartwatch चा स्फोट; चार वर्षाच्या मुलीच्या हाताला थर्ड डिग्री बर्न
By सिद्धेश जाधव | Published: July 7, 2021 06:36 PM2021-07-07T18:36:44+5:302021-07-07T18:38:19+5:30
Smartwatch Blast China: क्वाइनझोउ शहरातील यियी हुआंग स्मार्टवॉच हातावर बांधून आपल्या भावासोबत खेळत असताना अचानक एक जोरदार स्फोट झाला.
स्मार्टफोनमध्ये आग लागल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. परंतु आता अशी एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे स्मार्टवॉचचा वापर करणारे लोक स्मार्टवॉच वापरताना विचार करतील. एका मीडिया रिपोर्टनुसार चीनमधील क्वानझोउ शहरात राहणाऱ्या एका 4 वर्षांच्या मुलीचा हात स्मार्टवॉचमध्ये स्फोट झाल्यामुळे भाजला आहे. मुलीवर स्किन ग्राफ्टची प्रक्रिया करण्यात आला आहे.
याहू न्यूज ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चीनमधील क्वाइनझोउ शहरात घडली आहे. या शहरातील एक चार वर्षांची मुलगी यियी हुआंग एक स्मार्टवॉच वापरत होती. स्मार्टवॉच हातावर बांधून आपल्या भावासोबत खेळत असताना अचानक एक जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून तिची आजी घराबाहेर आली. बाहेर आल्यावर तिच्या आजीला मनगटावरून येणारा धूर आणि रडत असलेली यियी हुआंग दिसली. या स्मार्टवॉचच्या कंपनीची माहिती मात्र मिळाली नाही.
स्मार्टवॉचचा स्फोट इतका तीव्र होता कि यियी हुआंगला दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच तिचा हात भाजला होता. डॉक्टरांनी थर्ड-डिग्री बर्न झाल्याची माहिती दिली आणि त्वचेवर स्किन ग्राफ्टची प्रक्रिया करावी लागली. यियी हुआंगच्या वडिलांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.