आतापर्यंतचा सर्वात वेगवान प्रोसेसरसाठी Qualcomm सज्ज; Snapdragon 898 होणार पुढील महिन्यात लाँच
By सिद्धेश जाधव | Published: November 8, 2021 05:13 PM2021-11-08T17:13:45+5:302021-11-08T17:13:53+5:30
Qualcomm Snapdragon 898 Launch: Qualcomm ने डिसेंबरमध्ये Tech Summit चे आयोजन केले आहे. या इव्हेंटमधून कंपनी आपला आगामी फ्लॅगशिप प्रोसेसर सादर करू शकते.
Qualcomm कंपनी प्रोसेसर बनवण्याचे काम करते, ज्यांचा वापर फोन्स, अॅक्सेसरीज इत्यादीमध्ये केला जातो. कंपनी विविध बजेट आणि प्रोसेसिंग पॉवर असेलेले चिपसेट सादर करते. दरवर्षी कंपनी नवीन आणि सुधारित प्रोसेसर बाजारात घेऊन येते. यावर्षी Qualcomm ने डिसेंबरमध्ये Tech Summit चे आयोजन केले आहे. या इव्हेंटमधून गेल्यावर्षी सादर झालेल्या फ्लॅगशिप प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 888 ची जागा घेणारा नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगन 898 नावाने लाँच केला जाईल.
Qualcomm Snapdragon 898
टिप्स्टर Digital Chat Station ने SD898 चिप असलेल्या एका निनावी फोनचा फोटो शेयर केला आहे. या फोनमध्ये Device Info HW नावाचे बेंचमार्किंग अॅप दिसत आहे. या फोटोमधून क्वालकॉमच्या आगामी नवीन चिपसेटची माहिती मिळाली आहे. त्यानुसार, हा चिपसेट मॉडेल नंबर sm8450 सह बाजारात येईल. तसेच यात ट्राय-क्लस्टर आर्किटेक्चर आहे ज्यात कॉर्टेक्स एक्स2 प्राईम कोर 3.0GHz स्पीडवर काम करतील. 2.5Ghz स्पीडवर चालणारे तीन Cortex-A710 कोर आणि चार Cortex-A510 पॉवर-एफिशिएंट कोर 1.79GHz स्पीडसह देण्यात येतील. सोबत ग्राफिक्ससाठी एड्रेनो 730 जीपीयू देण्यात येईल. तसेच चिपसेटमध्ये स्नॅपड्रॅगन X65 5G असेल, अशी माहिती लीकमध्ये समोर आली होती.
हा प्रोसेसर लाँच होताच स्मार्टफोन कंपन्या या प्रोसेसरसह येणाऱ्या स्मार्टफोन्सची घोषणा करतील. यात Xiaomi आणि Vivo यांची नावे सर्वात वरती आहेत. या दोन्ही कंपन्या स्नॅपड्रॅगन 898 SoC असलेले फ्लॅगशिप फोन सादर करू शकतात. Xiaomi या चिपसेटचा वापर Xiaomi 12 मध्ये करू शकते. तर Vivo स्नॅपड्रॅगन 898 असलेला फोन NEX सीरिज मध्ये लाँच करू शकते.