सोशल मीडिया : ‘कनेक्टेड’ राहायचं असेल, तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 09:58 AM2021-12-30T09:58:41+5:302021-12-30T09:59:15+5:30
Social Media: आज आपलं जगणं जितकं व्यापलं आहे त्याहून अधिक या जगाचा आपल्या रोजच्या जगण्यात हस्तक्षेप होणार आहे, आणि हा प्रवास टाळता येण्यासारखा नाही.
- मुक्ता चैतन्य (समाज माध्यमाच्या अभ्यासक)
इंटरनेट, सोशल मीडिया आणि आभासी जगाने आपलं आयुष्य व्यापून टाकलं आहे. प्रत्यक्ष आणि आभासी अशी दोन जगं आता उरलेली नाहीत. आपल्या एकूण जगण्याचेच हे दोन भाग आहेत जे खरंतर आता समांतरही नाहीत. इतके ते एकमेकांमध्ये मिसळून गेले आहेत.
पण नजीकच्या भविष्यात म्हणजे पुढच्या १०/१५ वर्षात सोशल मीडिया आपल्या अपेक्षेपेक्षा मोठा होत जाणार आहे.
आज आपलं जगणं जितकं व्यापलं आहे त्याहून अधिक या जगाचा आपल्या रोजच्या जगण्यात हस्तक्षेप होणार आहे, आणि हा प्रवास टाळता येण्यासारखा नाही. समाज, व्यक्ती, कुटुंबात होणारे बदल जसे तिथे दिसतील तसंच तिथून बदल पाझरत आपल्या समाजात, घरात रुजतील. फेसबुकच्या मेटापासून के पॉप इंडस्ट्रीपर्यंत प्रत्येक गोष्टीतून याची सुरुवात झालेली आहे. या पुढची युद्ध जशी पर्यावरणाशी संबंधित असतील तशीच ती सांस्कृतिक असतील आणि निरनिराळी सोशल मीडिया माध्यमे ही युद्धभूमी. प्रत्येक गोष्ट सोशल मीडियाशी जोडली जाणार आहे. जे आता सुरू झालंय, ते भविष्यात अधिक तीव्र होणार!
अशात तगून राहण्यासाठी,त्याचा फायदा करून घेण्यासाठी ही माध्यमं आपल्याला समजून घ्यावीच लागतील. सोशल मीडियाचं भविष्य मोबाइल व्हिडिओ, व्हर्च्युअल रिॲलिटी आणि ऑगमेंटेड रिअलिटीमध्ये आहे. ज्या गोष्टी आपण आजवर फक्त सिनेमातून बघितल्या त्या प्रत्यक्षात उतरायला फार काळ जाणार नाही. खरेदी-विक्री, समाजबांधणी, आर्थिक व्यवहार ते सोशलायझिंग प्रत्येकच गोष्ट हायब्रीड होत जाणार, म्हणजे ऑफलाइनला ऑनलाइनची जोड मिळाल्याशिवाय गोष्टी पुढे सरकणारच नाहीत. या सगळ्या गदारोळात या माध्यमांच्या व्यसनात न अडकता, सायबर क्राइमचे बळी न ठरता, अति स्क्रीन टाइमच्या प्रश्नांशी न झगडता जर ही माध्यमं वापरत जगायचं असेल तर यापुढे सायबर स्पेसचा सकारात्मक वापर कसा करता येईल, याचा विचार करावा लागेल. आपल्यावर होणारे परिणाम कमीतकमी ठेवून जास्तीत जास्त सुयोग्य वापर कसा होईल, हे बघावं लागेल.
या आभासी जगाचा एकच नियम आहे : हे जग रोज बदलतं. क्षणा क्षणाला. सतत. बदलत नाही ती एकच गोष्ट, तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची ‘कनेक्टेड’ राहण्याची तीव्र इच्छा!