‘व्यसन हे एकदाच सुटतं, लागण्यापूर्वी !’...नशा ये रील्स का नशा है !
By मनोज गडनीस | Published: May 29, 2023 02:03 PM2023-05-29T14:03:20+5:302023-05-29T14:03:56+5:30
विख्यात नाटककार राम गणेश गडकरी लिखित ‘एकच प्याला’ या नाटकात एक मर्मभेदी वाक्य आहे. ते लिहितात की, ‘व्यसन हे एकदाच सुटतं, लागण्यापूर्वी !’, नाटकातील हे वाक्य विलक्षण आहे.
मनोज गडनीस
विख्यात नाटककार राम गणेश गडकरी लिखित ‘एकच प्याला’ या नाटकात एक मर्मभेदी वाक्य आहे. ते लिहितात की, ‘व्यसन हे एकदाच सुटतं, लागण्यापूर्वी !’, नाटकातील हे वाक्य विलक्षण आहे. किंबहुना तंत्रज्ञानाने व्यापलेल्या आजच्या आयुष्यात ‘सवयी’ आणि ‘व्यसन’ यातील सीमारेषा आता जेव्हा धूसर व्हायला लागली आहे, तेव्हा तर अशा वाक्याचा सखोल विचार करायला हवा. कारण आपल्याला काही गोष्टींची सवय आहे की, आपल्याला व्यसन लागलंय, हे तपासण्याची गरज आहे. तात्त्विक वाटाव्यात अशा या चार ओळी लिहिण्यामागचे कारण म्हणजे, आपल्या मेंदूला लागलेला इन्स्टाग्राम रील्सचा चाळा. चाळा हा शब्द कदाचित खुजा वाटेल इतके आपण आता या रील्सच्या आहारी गेलो आहोत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुष्परिणाम काय होतात ?
बहुतांश लोक दिवसभराचे काम आटपले की विरंगुळा म्हणून मनोरंजनाची विविध साधने हाताळतात. यामध्ये अलीकडच्या काळात विशेषतः झोपण्यापूर्वी लोक इन्स्टाग्रामचे रील्स पाहण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पण, यामुळे समस्या अशी निर्माण होते की, त्यात किती वेळ जातो हे कळत नाही.
दुसरे म्हणजे मोबाइलच्या स्क्रीनलाइटमुळे मेंदूला विशिष्ट प्रकारचे सिग्नल मिळतात आणि मेंदू अधिकाधिक जागृत होत जातो. याचा परिणाम झोप पुरेशी होत नाही. झोपेचा दर्जा देखील खालावतो. अन् याचा थेट परिणाम हा शरीरावर होतो.
मुळात एवढ्या कमी सेकंदांचे व्हिडीओ किंवा पोस्ट पाहिल्यामुळे एक पोस्ट पाहून समाधान होत नाही किंवा तो फॉर्मेट आवडल्यामुळे लोक पुढे पुढे स्क्रोल करत राहतात. याचा प्रमुख दुष्परिणाम असा की, माणसाची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता किंवा एकाग्रता कालावधी कमी होतो. इंग्रजीमध्ये याला अटेन्शन स्पॅन असे म्हणतात. ही क्षमता कमी झाली की, याचा थेट परिणाम आपल्या अन्य कामांवर होतो.
रील्सची नशा कुणाकुणाला असते ?
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, इन्स्टाग्रामच्या रील्सची नशा ही केवळ पाहणाऱ्या प्रेक्षकालाच असते असे नव्हे. तर जो रील्स बनवतो त्याला देखील याची नशा असतेच.
इंटरनेटच्या जगात ज्या काही नव्या गोष्टी किंवा ट्रेन्ड घडत असतात, त्यामध्ये आपणदेखील सहभागी व्हायला हवे, ही भावना बळावत जाते.
सातत्याने आपल्याला पाहिले गेले पाहिजे, कौतुक व्हायला हवे, आपण चर्चेत असायला हवे, अशी भावना मनात घट्ट होत जाते. मग याची सवय नव्हे, तर व्यसनच लागते.
सवय कशी सुटणार ?
नियंत्रण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, ज्या प्रमाणात तुमच्यावर माहिती येऊन आदळत असते, अशा वेळी तुम्हालाच तुमचा निर्णय घ्यायला हवा.
सवय लागण्याऐवजी जर आपणच एक निश्चित वेळ ठरवून त्यानुसार केवळ इन्स्टाग्रामच नव्हे, तर सोशल मीडिया हाताळला तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकते.
सवयीच्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकणार नाही. मात्र, नियंत्रण हाच कळीचा मुद्दा आहे.
रील्स का पाहिली जातात ?
मुळात मनोरंजनाच्या अन्य माध्यमाच्या तुलनेत इन्स्टाग्रामच्या रील्सचे वैशिष्ट्य म्हणजे याचा कालावधी किमान २० सेकंद ते कमाल ४० सेकंद इतकाच आहे.
एवढ्या कमी वेळात कधी गाणी, विनोद, फूड रेसिपी, हॉटेलच्या जाहिराती अशी वैविध्यपूर्ण माहिती प्रसारित करण्याचे महत्त्वाचे प्रमुख साधन आहे.
एवढ्या कमी वेळात असा वैविध्यपूर्ण कंटेट मिळत असल्याने लोक देखील याकडे झपाट्याने आकर्षित होत आहेत.