वाईड अँगल फ्रंट कॅमेर्याने सज्ज सोनी एक्सपेरिया एल २
By शेखर पाटील | Published: February 22, 2018 03:33 PM2018-02-22T15:33:35+5:302018-02-22T15:34:34+5:30
सोनी कंपनीने आपला एक्सपेरिया एल २ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारला असून यात वाईड अँगल फ्रंट कॅमेर्यासह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
सोनी कंपनीने आपला एक्सपेरिया एल २ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारला असून यात वाईड अँगल फ्रंट कॅमेर्यासह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
सोनी कंपनीने गेल्या वर्षी एक्सपेरिया एल १ हे मॉडेल लाँच केले होते. सोनी एक्सपेरिया एल २ हा स्मार्टफोन याचीच पुढील आवृत्ती आहे. जानेवारी महिन्याच्या प्रारंभी झालेल्या सीईएस-२०१८मध्ये याला पहिल्यांदा प्रदर्शीत करण्यात आले होते. आता हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात बहुतांश स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेरा केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. यावरच काही कंपन्या भर देतांना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमिवर, सोनी कंपनीने आपल्या सोनी एक्सपेरिया एल २ या मॉडेलमध्येही हाच मार्ग चोखाळला आहे. यातील फ्रंट कॅमेरा हा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा आणि एफ/२.४ अपार्चरयुक्त आहे. यासोबत यात १२० अंशाचा वाईल अँगल लेन्स प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने विस्तृत भागातील दर्जेदार सेल्फी घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर एफ/२.० अपार्चर आणि एलईडी फ्लॅशने युक्त असणारा यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे.
सोनी एक्सपेरिया एल २ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यात सोनी कंपनीने विकसित केलेल्या इमेज इनहान्स टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा एमटी ६७३७टी हा प्रोसेसर असेल. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. क्युनोव्हो अॅडाप्टीव्ह चार्जींग या तंत्रज्ञानाने सज्ज असणारी यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यात स्टॅमिना मोड आणि बॅटरी सेव्ह हे फिचर्स असल्याने ही बॅटरी दीर्घ काळापर्यंत टिकत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
सोनी एक्सपेरिया एल २ या स्मार्टफोनमध्ये मुव्ही क्रियेटर, एआर इफेक्ट आणि एक्सपेरिया लाऊंज आदी अॅप्स प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहेत. हे मॉडेल काळा आणि सोनेरी या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना १९,९९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.