लवकरच येणार फोर-जी नेटवर्क सपोर्टयुक्त सरफेस प्रो
By शेखर पाटील | Published: October 3, 2017 12:56 PM2017-10-03T12:56:32+5:302017-10-03T12:58:26+5:30
मायक्रोसॉफ्ट कंपनी आपल्या फ्युचर डिकोडेड या कार्यक्रमात फोर-जी नेटवर्क सपोर्टयुक्त सरफेस प्रो हे टु-इन-वन अर्थात लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारात वापरण्यास सक्षम असणारे मॉडेल लाँच करणार आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनी आपल्या फ्युचर डिकोडेड या कार्यक्रमात फोर-जी नेटवर्क सपोर्टयुक्त सरफेस प्रो हे टु-इन-वन अर्थात लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारात वापरण्यास सक्षम असणारे मॉडेल लाँच करणार आहे.
या वर्षी मे महिन्यात शांघाय शहरात आयोजित कार्यक्रमात मायक्रोसॉफ्टने सरफेस प्रो हे मॉडेल सादर केले होते. तेव्हाच यातील एका व्हेरियंटला एलटीई फोर-जी नेटवर्क असेल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत हे मॉडेल ग्राहकांना प्रत्यक्षात उपलब्ध करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमिवर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस लंडन शहरात मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हे मॉडेल लाँच करण्यात येणार असल्याचे वृत्त असून कंपनीच्या प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे.
मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो हे टु-इन-वन या प्रकारातील म्हणजेच लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारे वापरणे शक्य आहे. यात १२.३ इंच आकारमानाचा पिक्सलसेल (१८२४ बाय २७३६ पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले १६५ अंशापर्यंत वाकवून वापरणे शक्य आहे. हे मॉडेल विंडोज १० प्रो या प्रणालीवर चालणारे असेल. यासोबत नवीन अलकांट्रा हा अतिशय उत्तम दर्जाचा कि-बोर्डही प्रदान करण्यात आला आहे. यात अतिशय गतीमान असा इंटेलचा सातव्या पिढीतील कॅबे लेक प्रोसेसर प्रदान करण्यात आला होता. तथापि, नवीन मॉडेलमध्ये कोअर आय-५ हा प्रोसेसर असेल. तर हे मॉडेल चार जीबी रॅम ४ व १२८ जीबी इनबिल्ट स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १३.५ तासांपर्यंत चालत असल्याचा दावा मायक्रोसॉफ्टतर्फे करण्यात आला आहे. ऑटो-फोकसच्या सुविधेसह याच्या मागील बाजूस ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा प्रदान करण्यात आला आहे. सरफेस प्रो या मॉडेलसोबत मायक्रोसॉफ्ट कंपनीने अतिशय उत्तम दर्जाचा नवीन पेनदेखील उपलब्ध केला आहे. याच्या मदतीने या मॉडेलच्या डिस्प्लेवर अतिशय सुलभरित्या रेखाटन करता येणार आहे. तसेच यात सीमकार्डसाठी स्वतंत्र स्लॉट असेल.
मायक्रोसॉफ्टच्या या नवीन मॉडेलमध्ये एलटीई नेटवर्क सपोर्ट असल्यामुळे यात सीमकार्डचा उपयोग करता येईल. या नवीन मॉडेलचे मूल्य आणि नेमकी उपलब्धता याबाबत मात्र कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. तथापि, फ्युचर डिकोडेड कार्यक्रमात याची घोषणा होईल हे मात्र निश्चित मानले जात आहे.