लवकरच आयओएससाठी व्हॉट्सअॅपचे बिझनेस अॅप
By शेखर पाटील | Published: May 8, 2018 11:17 AM2018-05-08T11:17:52+5:302018-05-08T11:17:52+5:30
व्हॉट्सअॅप मॅसेंजरचे बिझनेस अॅप हे अँड्रॉइडच्या पाठोपाठ आता आयओएस या प्रणालीसाठी सादर करण्यात येणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.
व्हॉट्सअॅपने खास करून व्यावसायिकांसाठी विकसित केलेल्या व्हाटसअॅप फॉर बिझनेस या अॅपला गत वर्षाच्या शेवटी लाँच करण्यात आले होते. यानंतर या वर्षाच्या जानेवारी महिन्यात याला भारतीय युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. अर्थात आजवर फक्त अँड्रॉइडच्या युजर्सलाच याचा वापर करता येत आहे. तथापि, लवकरच हे अॅप आयओएस या प्रणालीसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. याबाबत लवकरच घोषणा होऊने हे अॅप अॅपलच्या अॅप स्टोअरवर दाखल होऊ शकते. विद्यमान व्हॉट्सअॅप युजर याला आपल्या आधीचे मूळ व्हाटसअॅप अकाऊंट असणार्या स्मार्टफोनवर वापरू शकतो. मात्र, याच्या नोंदणीसाठी स्मार्टफोनमधील दुसरा मोबाईल क्रमांक लागणार आहे. यामुळे कुणीही आपल्या ड्युअल सीमकार्डच्या स्मार्टफोनमध्ये मूळ व्हॉट्सअॅप आणि व्हॉट्सअॅपचे बिझनेस अॅप हे दोन्ही अॅप्लीकेशन्स वापरू शकतात.
व्हॉट्सअॅपचे बिझनेस अॅप हे देशातील लहान व मध्यम व्यावसायिकांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. यात कुणीही व्यावसायिक आपल्या ग्राहकांशी थेट संपर्क साधू शकणार आहेत. विशेष बाब म्हणजे ग्राहकाला यात अनावश्यक संदेशांमुळे त्रास होणार नसल्याची काळजीदेखील घेतली जाणार आहे. यात ग्राहक व्यावसायिकांकडून येणार संदेश ब्लॉकदेखील करू शकतो. या अॅप्लीकेशनमध्ये मूळ व्हॉट्सअॅप मॅसेंजरमधील सर्व सुविधांसह अन्य विशेष फिचर्स देण्यात आलेले आहेत. यातील प्रमुख फिचर्स खालीप्रमाणे आहेत.
व्हेरिफाईड अकाऊंट
व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप हे अनेक फिचर्सनी युक्त असून यात व्हेरिफाईड अकाऊंटची व्यवस्थादेखील असेल. याच्या माध्यमातून संबंधीत व्यावसायिकाचा नाव/पत्ता आणि त्याचा मोबाईल क्रमांक हा एकच असल्याची खात्री पटवून तसे व्हेरिफाईट टिकच्या माध्यमातून दर्शविण्यात येणार आहे.
बिझनेस प्रोफाईल
व्हॉट्सअॅपच्या बिझनेस अॅपमध्ये कोणत्याही व्यावसायिकाला आपले प्रोफाईल अपडेट करण्याची सुविधा असेल. यासाठी स्वतंत्र भाग असून यात संबंधीताचे नाव, पत्ता, संकेतस्थळ, ई-मेल आदींचा समावेश असणार आहे. फेसबुकसारख्या सोशल साईटप्रमाणे याची रचना असते.
स्मार्ट मॅसेजींग
मॅसेजींग हा व्हॉट्सअॅपचा आत्मा आहे. यालाच बिझनेस अॅपमध्ये नवीन पध्दतीने समाविष्ट करण्यात आले आहे. यात बिझनेस चॅटींगला उपयुक्त असणार्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये क्विक रिप्लायचा समावेश असेल. याचा उपयोग करून व्यावसायिकाला ग्राहकांशी थेट आणि तात्काळ संपर्क करता येईल. तसेच व्यावसायिक आपल्या व्यवसायाच्या माहितीसह विविध ऑफर्सला ग्राहकांपर्यंत सुलभपणे पोहचवू शकतो. यामध्ये मॅसेजींच्या आकडेवारीचे अचूक विश्लेषण करणारी प्रणालीदेखील देण्यात आलेली असेल. याच्या मदतीने मॅसेजेसच्या परिणामकारकतेची माहिती मिळू शकते.