शाओमी मी ए१ची विशेष आवृत्ती
By शेखर पाटील | Updated: December 19, 2017 15:08 IST2017-12-19T13:28:56+5:302017-12-19T15:08:34+5:30
शाओमी कंपनीने ड्युअल आपल्या मी ए1 या स्मार्टफोनची विशेष आवृत्ती बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

शाओमी मी ए१ची विशेष आवृत्ती
शाओमी कंपनीने ड्युअल आपल्या मी ए१ या स्मार्टफोनची विशेष आवृत्ती बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे. शाओमी कंपनीने सप्टेबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी ए१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारला होता. आता या स्मार्टफोनची लाल रंगातील विशेष आवृत्ती मर्यादीत स्वरूपात सादर करण्यात आली असून ग्राहकांना हे मॉडेल २० डिसेंबरपासून खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलसह कंपनीच्या मी.कॉम या संकेतस्थळावरून १३,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे.
शाओमी मी ए१ स्मार्टफोनच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे आहेत. यातील एकाला टेलिफोटो लेन्स तर दुसर्याला वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. यात बोके इफेक्टची सुविधा देण्यात आली आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असेल. या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १०८० बाय १९२० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते ३०० जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील असेल. तर कनेक्टीव्हिटीसाठी फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.
शाओमी मी १ हे मॉडेल अँड्रॉइड वन या प्रणालीवर चालणारे आहे. खरं तर अलीकडे अँड्रॉइड वन प्रणाली जवळपास मृतप्राय झाल्याचे दिसून येत होते. तथापि, शाओमी मी ए १ या मॉडेलने अँड्रॉइड वन प्रणाली चर्चेत आली आहे. अर्थात शाओमी मी ए १ हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून याला ओरिओ या आवृत्तीचे अपडेट लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. आजवर शाओमी कंपनीचे स्मार्टफोन अँड्रॉइडपासून विकसित करण्यात आलेल्या एमआययुआय या युजर इंटरफेसवर चालत असत. या मॉडेलच्या माध्यमातून शाओमी कंपनीने पहिल्यांदाच शुद्ध अँड्रॉइडचा मार्ग पत्करल्याचे दिसून येत आहे.