आयपीएलसाठी स्नॅपचॅटचे खास फिचर्स
By शेखर पाटील | Published: April 12, 2018 02:10 PM2018-04-12T14:10:49+5:302018-04-12T14:10:49+5:30
स्नॅपचॅट या टिनएजर्समध्ये लोकप्रिय असणार्या अॅपने इंडियन प्रीमियर लीगसाठी खास फिचर्स प्रदान करण्याची घोषणा केली आहे.
स्नॅपचॅट या टिनएजर्समध्ये लोकप्रिय असणार्या अॅपने इंडियन प्रीमियर लीगसाठी खास फिचर्स प्रदान करण्याची घोषणा केली आहे.
आयपीएल-२०१८ मध्ये अनेक टेक कंपन्यांनी रस घेतल्याचे दिसून येत आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक विवो ही स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. आयपीएलच्या प्रेक्षकांना आकर्षीत करण्यासाठी बहुतांश सेल्युलर कंपन्यांनी आकर्षक प्लॅन्स सादर केले आहेत. तसेच या लीगमधील सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग आकर्षक पध्दतीने सादर करण्यासाठी अनेक कंपन्या सरसावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, स्नॅपचॅट अॅपनेदेखील आयपीएलच्या लोकप्रियतेचा वापर करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने स्नॅपचॅटने मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघांशी सहकार्याचा करार केला आहे. याच्या अंतर्गत या संघांसाठी स्नॅपचॅटने खास फिल्टर्स तयार केले आहेत. याच्या जोडीला हे संघ स्नॅपचॅटसाठी खास स्टोरीज तयार करणार आहेत. तर युजर्ससाठी कस्टम फिल्टर्स, लेन्सेस आणि स्टीकर्स सादर करण्यात आले आहेत. कुणीही युजर या संबंधीत चार आयपीएल संघांचा स्नॅपकोड स्कॅन करून या टुल्सला वापरू शकतो. तर या चारही संघांनी तयार केलेले स्नॅप हे स्नॅपचॅट अॅपच्या डिस्कव्हर या फिचरच्या मदतीने शोधता येणार आहेत.
स्नॅपचॅट हे अॅप भारतीय युजर्समध्येही हळूहळू लोकप्रिय होऊ लागले आहे. याचा व्यावसायिक उपयोगदेखील होत असल्यामुळे अनेक कंपन्या याकडे आकर्षीत होत आहेत. यामुळे आयपीएलसारख्या अत्यंत लोकप्रिय असणार्या स्पर्धेचा वापर करून स्नॅपचॅट आता भारतात आपल्या विस्ताराची योजना तयार करत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.