भारतापूर्वी आपल्या शेजारील देशात सुरू झाली Starlink सॅटेलाईट इंटरनेट सेवा; किंमत किती..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 21:22 IST2025-02-12T21:21:36+5:302025-02-12T21:22:17+5:30
इलॉन मस्कची कंपनी लवकरच भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करू शकते.

भारतापूर्वी आपल्या शेजारील देशात सुरू झाली Starlink सॅटेलाईट इंटरनेट सेवा; किंमत किती..?
Starlink : उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या स्टारलिंक कंपनीचे सॅटेलाईट इंटरनेट भारतात कधी येणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गेल्या काही काळापासून या इंटरनेट सेवेची जगभरात चर्चा सुरू आहे. दरम्या, ही सेवा लवकरच भारतात सुरू होऊ शकते. पण, भारतापूर्वी आपला शेजारील देश भूतानमध्ये ही सॅटेलाईट आधारित इंटरनेट सेवा सुरू झाली आहे.
इलॉन मस्कची कंपनी लवकरच भारतातही सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करू शकते. दूरसंचार नियामकाद्वारे स्पेक्ट्रम वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, कंपनी भारतातही आपली सेवा सुरू करेल. स्टारलिंकने आपल्या अधिकृत X हँडलद्वारे याची घोषणा केली आहे. दरम्यान, भारतापूर्वी भूतानमध्ये स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. या ठिकामी ही सेवा सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे, तेथे डोंगराळ जास्त भाग आहे. अशा परिस्थितीत सॅटेलाईट आधारित इंटरनेट सेवा पुरवणे अधिक सोपे आणि कमी खर्चाचे ठरणार आहे.
किंमत किती आहे?
स्टारलिंकच्या वेबसाइटनुसार, भूतानच्या माहिती विभागाने सॅटेलाइट इंटरनेट सेवेची किंमत निश्चित केली आहे. येथे रेसिडेन्शिअल लाइट प्लॅनची किंमत Nu 3,000 पासून सुरू होते, म्हणजे अंदाजे 3,100 रुपये प्रति महिना, ज्यामध्ये वापरकर्त्यांना 23 bps ते 100 bps च्या वेगाने इंटरनेट मिळते. तर, स्टँडर्ड रेसिडेन्शिअल प्लॅनसाठी दरमहा Nu 4,200 रुपये, म्हणजेच अंदाजे 4,300 रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये यूजर्सना 25 bps ते 110 bps च्या स्पीडने इंटरनेट सेवा मिळेल. इलॉन मस्कच्या सॅटेलाइट इंटरनेट सेवेची किंमत तिथल्या स्थानिक टेलिकॉम ऑपरेटर्सपेक्षा खूप जास्त आहे.
सॅटेलाइट इंटरनेट सेवा कशी मिळवायची?
स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा कंपनीच्या SpaceX द्वारे उपलब्ध आहे. त्यासाठी ग्राउंड टर्मिनल्स बसवले जातात, ज्याद्वारे घरोघरी इंटरनेट पोहोचवले जाते. स्टारलिंक त्यांचे इंटरनेट लोकांच्या घरी पोहोचवण्यासाठी ग्राउंड टर्मिनल किंवा रिसीव्हर्स स्थापित करते. सॅटेलाइटमधून इंटरनेट बीम या टर्मिनलवर येतो आणि त्याला जोडलेल्या वायर्सद्वारे घराघरांत पोहोचवला जातो. याचा अर्थ भूतानच्या लोकांना स्टारलिंक ग्राउंड रिसीव्हर बसवून डोंगराळ भागातही सुपरफास्ट इंटरनेट सेवा मिळू शकेल.
भारतात कधी लॉन्च होणार?
येत्या काही महिन्यांत स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा भारतातही सुरू होऊ शकते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण लवकरच यासाठी स्पेक्ट्रम वाटपाची प्रक्रिया सुरू करू शकते. स्पेक्ट्रम वाटप पूर्ण झाल्यानंतर, स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्याची परवानगी मिळेल.