यश जेवढे झटकन मिळते, तेवढ्याच चटकन...! शाओमीचेही तसेच झाले, पहिल्या पाचात राहतेय की नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 12:39 PM2023-08-04T12:39:10+5:302023-08-04T12:39:28+5:30
कोणे एकेकाळी नाही तर अवघ्या दोन वर्षांपूर्वी भारतात नंबर वन असलेली शाओमी पाचव्या क्रमांकावर घसरली आहे.
भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये चिनी ब्रँड विवोने सॅमसंगला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. जुलैमध्ये हा एक धक्का झालाच परंतू त्याहून मोठा धक्का शाओमीला बसला आहे. कोणेएकेकाळी नाही तर अवघ्या दोन वर्षांपूर्वी भारतात नंबर वन असलेली शाओमी पाचव्या क्रमांकावर घसरली आहे.
तसे पहायला गेल्यास व्हिवो, शाओमी, ओप्पो, रिअमलमी या चिनी कंपन्या आहेत. म्हणजे चीनविरोधात भारतीयांची आघाडी असे काही चित्र नाहीय. परंतू, गेल्या काही काळापासून शाओमी चांगले स्मार्टफोन आणण्यात अपयशी ठरली आहे. डिझाईन, फिचर्स आणि कॅमेरा क्वालिटी आदींमध्ये व्हिवो सध्या बाजी मारत आहे. याचाच फटका सॅमसंगलाही बसला आहे.
इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) च्या ताज्या अहवालानुसार, 2023 च्या दुसऱ्या तिमाहीतील डेटा आला आहे. दुसऱ्या तिमाहीच्या शेवटच्या महिन्यापर्यंत, Vivo ने आपला बाजार हिस्सा 16 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. जो गेल्या वर्षी या तिमाहीत 14.5 टक्के होता. या कालावधीत कंपनीच्या शिपमेंटमध्ये 7.4 टक्के वाढ दिसून आली आहे.
आयडीसीच्या अहवालात कोरियन कंपनी सॅमसंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षी दुसऱ्या तिमाहीत, कंपनीचा हिस्सा 15.7% आहे, तर सॅमसंगचा बाजार हिस्सा गेल्या वर्षी या तिमाहीत 16.3% होता. Realme ब्रँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत Realme चा बाजारातील हिस्सा १२.६ टक्के आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत हा आकडा १७.५ टक्के होता. Oppo ब्रँड चौथ्या स्थानावर आहे, ज्याचा बाजार हिस्सा 11 टक्के आहे.
एकेकाळी भारतीय बाजारपेठेत अव्वल स्थानावर असलेली Xiaomi आता पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ब्रँडचा बाजारातील हिस्सा 11 टक्के आहे, जो गेल्या वर्षी 17.6 टक्के होता.