सुंदर पिचईंनी शब्द पाळला; चीनला दणका दिला, गुगलची भारतात शोधाशोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 10:36 AM2023-06-22T10:36:41+5:302023-06-22T10:37:16+5:30
गुगल लवकरात लवकर मेड इन इंडिया टॅग असलेले पिक्सल फोन भारतात विकण्याच्या तयारीत आहेत.
अॅप्पलने चीनला दणका देऊन आयफोनची निर्मिती भारतात सुरु केली होती. आता गुगलने देखील भारताची वाट पकडली आहे. पिक्सलचे उत्पादन आता भारतात केले जाणार आहे. गुगल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधत आहे. यामुळे येत्या काळात पिक्सल मेड इन चायना नाही तर मेक इन इंडिया होणार आहे.
गुगल लवकरात लवकर मेड इन इंडिया टॅग असलेले पिक्सल फोन भारतात विकण्याच्या तयारीत आहेत. यासाठी गुगलने फॉक्सकॉन, लावा आणि डिक्सन टेक्नॉलॉजीसोबत संपर्क साधला आहे. गुगलकडे व्हिएतनाम आणि भारत असे दोन पर्याय होते. परंतू, गुगलने भारताला निवडले आहे. सप्लायर्ससोबत चर्चा सुरु असून ती सफल ठरली तर गुगलची उत्पादने भारतात तयार होणार आहेत. भारत सरकारने स्थानिक पातळीवर स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपन्यांना वेगवेगळ्या सवलती देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे या कंपन्या आता भारताकडे येऊ लागल्या आहेत. दुसरीकडे चीनमध्ये उत्पादनावर संकटे येत असतात.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी तसे सुतोवाच केले होते. गुगल लवकरच पिक्सल फोन भारतात उत्पादित करू शकते असे ते म्हणाले होते. अॅप्पल आपल्या एकूण उत्पादनापैकी १८ टक्के उत्पादन हे २०२५ पर्यंत भारतात शिफ्ट करू शकते. गुगल पिक्सल फोनला भारतात चांगला प्रतिसाद मिळत नाहीय. यामुळे गुगलने प्रिमिअम ऐवजी मिड रेंज स्मार्टफोन लाँच करण्यावर भर दिला आहे.