Tata To Make iPhone: चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान; टाटा खरेदी करणार iPhone निर्मिती प्रकल्प..!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 02:59 PM2023-01-10T14:59:21+5:302023-01-10T14:59:42+5:30
Tata Group: लवकरच टाटा समूह भारतात iPhone चे मॅन्युफॅक्चरिंग करेल.
Tata To Make iPhone:टाटा ग्रुप (Tata Group) लवकरच भारतात आयफोन (iPhone) बनवताना दिसणार आहे. देशातील सर्वात मोठा आणि जुना औद्योगिक समूह असलेला टाटा समूह आयफोनची निर्मिती करणारी पहिली भारतीय कंपनी असेल. टाटा लवकरच दक्षिण भारतात असलेला तैवानच्या विस्ट्रॉन ग्रुपचा (Wistron Group) प्लांट खरेदी करेल. हा करार लवकरच पूर्ण होईल. यानंतर टाटा समूह विस्ट्रॉनच्या सहकार्याने भारतात आयफोनची निर्मिती करेल. या संयुक्त उपक्रमात टाटा समूहाचा सर्वात मोठा वाटा असेल.
Apple च्या आयफोनचे असेंबलिंग तैवानच्या विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपच्या (Foxconn Technology Group) कंपनीत केले जाते. टाटा समूहाने आयफोन उत्पादनात प्रवेश केल्यानंतर चीनच्या वर्चस्वाला आव्हान देण्यास मदत होईल. आयफोनच्या निर्मितीमध्ये सध्या चीनचा मोठा दबदबा आहे. एकूण आयफोनपैकी 85 टक्के आयफोन चीनमध्ये तयार होतात.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, टाटा समूहाचा विस्ट्रॉनसोबतचा करार 31 मार्च 2023 पूर्वी पूर्ण होईल. त्यानंतर टाटा समूह विस्ट्रॉनची जागा घेईल. 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षापासून सरकारच्या प्रोत्साहनाचा लाभ टाटा इलेक्ट्रॉनिक्सलाही मिळेल. विस्ट्रॉन व्यतिरिक्त, तैवानची फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉनदेखील आयफोन तयार करतात.
आयफोन असेंबल करणे हे एक आव्हानात्मक काम आहे, कारण अमेरिकेतील अनेक गुणवत्ता मानकांची पूर्तता यात करावी लागते. नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या माध्यमातून आयफोनचे असेंबलिंग 5 पटीने वाढवण्याचे लक्ष्य आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी यापूर्वी सांगितले होते की, कंपनीचे लक्ष उच्च दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर असेल. विस्ट्रॉन 2017 पासून भारताच्या कर्नाटक राज्यात आयफोन असेंबल करत आहे. पण, कंपनी सध्या मोठ्या तोट्यात आहे, त्यामुळे टाटाने त रस दाखवला आहे.