टीसीएसचा 'कॅम्पस इंटरव्ह्यू' ना रामराम...प्रक्रियाच बदलली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 01:36 PM2018-09-25T13:36:22+5:302018-09-25T13:37:27+5:30
टाटा कंसल्टंसी सर्विसेस ही भारतात सर्वाधिक कर्मचारी असलेली कंपनी आहे. यामुळे ही कंपनी मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्स विद्यार्थ्यांनाही नोकरी देते.
बेंगळुरु : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे स्वरूप बदलले असून ऑनलाईन टेस्ट आणि व्हिडिओद्वारे इंटरव्ह्यूमुळे देशातील कानाकोपऱ्यातील हुशार उमेदवारांपर्यंत पोहोचली आहे. याचबरोबर कॉलेजमध्ये जाऊन मुलाखती घेण्याच्या पद्धतीवरही टीसीएस कमी अवलंबून राहणार आहे.
टाटा कंसल्टंसी सर्विसेस ही भारतात सर्वाधिक कर्मचारी असलेली कंपनी आहे. यामुळे ही कंपनी मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्स विद्यार्थ्यांनाही नोकरी देते. मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागत असल्याने कंपनीला चांगल्या उमेदवारांच्या शोधात देशातील मोठ्या शहरांच्या कॉलेजमध्ये जावे लागत होते. मात्र, यामध्ये वेळ जाण्याबरोबरच बऱ्याचदा हुशार उमेदवारही सापडत नव्हते. यामुळे देशातील अन्य भागातील चांगली मुले दुर्लक्षितच राहत होती.
यामुळे टीसीएसने नॅशनल क्वालिफायर टेस्ट नावाची एक पॅन इंडिया ऑनलाईन टेस्ट सुरु केली आहे. ही टेस्ट देशातील कोणत्याही ठिकाणावरून देता येते. यानंतर निवडलेल्या उमेदवारांची टीसीएसचे अधिकारी व्हिडिओद्वारे मुलाखत घेतात. कंपनीनुसार या टेस्टद्वारे कंपनी दूरवरील उमेदवारांपर्यंत पोहोचत आहे. तसेच नियुक्ती प्रक्रिया 3 ते ४ आठवड्यांत पूर्ण होते. याआधी कंपनी 370 कॉलेजांमध्ये जाऊन कॅम्पस इंटरव्ह्यू घेत होती. मात्र, ऑनलाईनमुळे टीसीएस 2000 कॉलेजांपर्यंत पोहोचत आहे.
कंपनीच्या या डिजिटल iON प्लॅटफॉर्मसाठी 24 राज्यांतील 100 शहरांतून 2.8 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. जुन्या पद्धताने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा हे प्रमाण 175 टक्के जास्त होते. आता कंपनी या कॉलेजांमध्ये जात नसून मान्यताप्राप्त कॉलेजांमध्ये हे विद्यार्थी मुलाखत देण्यासाठी येत आहेत. यामुळे वेळ आणि पैसाही वाचत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.