नंबर पोर्टेबलिटीवर टेलिकॉम कंपन्यांची मनमानी चालणार नाही; ट्रायनं SMS बाबत दिले ‘हे’ आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 05:21 PM2021-12-09T17:21:08+5:302021-12-09T17:21:27+5:30
नंबर पोर्टेबिलिटी विनियम २००९ अंतर्गत ग्राहकांना संबंधित सुविधा देण्याचे आदेश TRAI ने सर्व कंपन्यांना दिले.
नंबर पोर्टेबिलिटीबाबत (MNP) टाळाटाळ करणाऱ्या दूरसंचार कंपन्यांविरोधात (Tlecom Companies) दूरसंचार नियामकाने कठोर भूमिका घेतली आहे. ट्रायने (TRAI) सर्व दूरसंचार कंपन्यांना पोर्टेबिलिटीबाबत लादलेल्या अटी तात्काळ हटवण्यास सांगितलं आहे. TRAI ने मोबाइल ऑपरेटरना पोर्टेबिलिटीसाठी तात्काळ आउटगोइंग एसएमएस सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान, मोबाइल नंबर पोर्टेबलिटीमध्ये अनेक अडचणी येत असल्यामुळे नंबर पोर्ट करता येत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांनी ट्रायकडे केल्या होत्या.
दरम्यान, कंपन्या काही प्रीपेड व्हाउचर/प्लॅनमध्ये मोबाइल नंबर पार्टेबिलिटीशी संबंधित एसएमएस पाठवण्याची सुविधा देत नाहीत. ग्राहकांना पोर्टेबलिटीसाठी मोठे रिचार्ज करण्याच्या अटीही घालतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक आपला नंबर पोर्ट करू शकत नाहीत. कितीही रकमेचा रिचार्ज केला असला तरी सर्व ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ट्रायनं कंपन्यांच्या काही प्रीपेड व्हाउचरमध्ये आउटगोइंग एसएमएस सेवा न देण्याच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
आपल्याकडे रिचार्ज पॅक असतानाही मोबाइल क्रमांत पोर्ट करताना UPC जनरेट करण्यासाठी 1900 या क्रमांकावर एसएमएस पाठवता येत नसल्याच्या तक्रारी मिळाल्याचं ट्रायनं सांगितलं. दरम्यान, नंबर पोर्टेबलिटी विनियम २००९ अंतर्गत प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना पोर्टेबलिटीची सुविधा देण्यासाठी १९०० या क्रमांकावर एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळावी असे निर्देश नियामकानं दिलेत.