हे माझं काम आहे, तुम्ही दुसरं शोधा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 08:07 AM2023-05-07T08:07:59+5:302023-05-07T08:09:02+5:30
आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील विविध कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली जात आहे. त्यातच आता कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आदी नवतंत्रज्ञानांमुळे मनुष्यबळाची गरज दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे अनेक नोकरदारांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.
ऋषिराज तायडे, उपसंपादक
कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंगच्या वापरामुळे आपल्या सर्वांचेच जीवन अधिक सुसह्य असल्याचे आपण पाहत आहोत. चॅटजीपीटी, बार्डसारख्या एआयवर आधारित चॅटबॉट सेवांमुळे अनेक कामे सोपी झाली. शिक्षण, आरोग्य, आयटी, सेवा, आदींसह अनेक क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. परंतु, एआयचे जितके फायदे आपल्याला दिसत आहेत, तितका फटकाही आगामी काळात बसणार असल्याचे चित्र आहे. एआयमुळे नोकऱ्यांवर मोठा परिणाम होणार आहे. अनेक कंपन्यांनी एआयचा आधार घेत मनुष्यबळ कमी करण्यास सुरुवातही केली आहे. सध्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता विविध क्षेत्रांच्या तुलनेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक साठ टक्क्यांहून अधिक, तर प्रशासकीय क्षेत्रातील ४६ टक्के, कायदेविषयक सेवेतील ४४ टक्के कामे एआयच्या मदतीने केली जाऊ शकतात, असे एका अहवालात नमूद केले आहे. आयबीएमही आगामी काळात जवळपास सात हजार आठशे लोकांचे काम एआयच्या हाती सोपवणार आहे. ही बदलाची नांदी आहे. एआय आता त्याचे काम वाढवत आहे. तुम्हाला दुसरे काम शोधावे लागेल, तयार आहात का?
नव्या नोकऱ्यांचीही मिळणार संधी
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकरकपात होण्याबरोबरच नव्या नोकऱ्याही निर्माण होतील, असा विश्वास वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने व्यक्त केला. शिक्षण, कृषी, ई-कॉमर्स, व्यापार, बँकिंग, आदी क्षेत्रांमध्ये पुढील काही काळात दहा टक्के रोजगार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास ३० लाख नव्या नोकऱ्या तयार होतील. बहुतांश रुग्णालयांमध्ये रोबोटिक्सचा वापर वाढला, तरी पेपरवर्क किंवा तत्सम कामे पारंपरिक पद्धतीने केली जातात. या जागा एआय घेईल.
नोकऱ्यांवर कसा परिणाम?
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार, तंत्रज्ञानाच्या वाढत्या विस्तारामुळे पुढील पाच वर्षांच्या काळात ८.३ कोटी नोकऱ्यांवर गदा येणार आहे, तर ६.९ कोटी नव्या नोकऱ्या निर्माण होतील. एकंदरीत विचार केल्यास १.४ कोटी नोकऱ्या सरसकट कमी होणार आहे. प्रामुख्याने एचआर, न्यायिक सेवा, लिपिक, रोखपाल, वृत्तनिवेदक, डीटीपी ऑपरेटर, आदी कामे तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यावर भर असेल. पुढील काळात ३० कोटी मनुष्यबळाएवढा रोजगार कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशनद्वारे सहजगत्या बदलला जाऊ शकतो, असे भाकीत गोल्डमन सॅचने व्यक्त केले आहे.
नियंत्रणासाठी कायदा
कृत्रिम बुद्धिमत्तेचा धोकाही लक्षात आले नाही, असे नाही. युरोपियन युनियनने हे हेरले आहे. त्यामुळेच युनियनने कायदा तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. प्रस्तावित विधेयकावर ११ मे रोजी युरोपीय संसदेत मतदान होणार आहे.
कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक फटका
वित्त आणि बँकिंग : जगातील प्रमुख बँकांमध्ये भविष्यात लिपिक, रोखपालांची कामे एआयद्वारे केली जातील. मग, नोकऱ्या किती जाती, याचा केवळ अंदाज करा.
माध्यमे : येत्या काही वर्षांत जवळपास ९० टक्के स्क्रिप्ट मशीन एआयच्या मदतीने लिहिल्या जातील. काही वाहिन्यांमध्ये वृत्तनिवेदक म्हणून एआय रोबोचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. भविष्याचा वेध यातून घेता येईल.
न्यायिक सेवा : न्यायालयांमध्ये एखाद्या खटल्याच्या सुनावणीनंतर सविस्तर निकालपत्र लिहिण्यासाठी किंबहुना त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी एआय टूलचा प्रभावी वापर होऊ शकतो.
निर्मिती : अनेक कारखान्यांमध्ये यात्रिक हात काम करतात. इलाॅन मस्कने टेस्लामध्ये विविध कामांसाठी टेस्ला बोट सुरू करणार असल्याचे म्हटले. निर्मिती क्षेत्रात २०२५ पर्यंत २० लाख रोजगार एआयमुळे कमी होतील.