रोबोटला लागतील धापा, गळतील घामाच्या धारा! नवे संशोधन, मानवी त्वचेचे ३५ थर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 10:08 AM2023-07-26T10:08:30+5:302023-07-26T10:08:41+5:30
सध्या रोबोट्स विविध क्षेत्रांत सुरक्षिततेसाठी आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण देण्याचीही कामे करत आहे.
नवी दिल्ली : सध्या रोबोट्स विविध क्षेत्रांत सुरक्षिततेसाठी आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण देण्याचीही कामे करत आहे. आता आणखी एक नवीन रोबो तयार करण्यात आला असून, तो माणसासारखा श्वास तर घेतोच शिवाय काम केल्यानंतर घामही गाळतो. त्याला कडकडून थंडीही जाणवते. थर्मेट्रिक्सने या रोबोटला ‘स्वेटी रोबोट’ असे नाव दिले आहे.
या थर्मल रोबोटमध्ये अशी वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत, ज्यामुळे तो मानवासारखा वाटतो. रोबोटमध्ये त्वचेचे ३५ थर दिले आहेत.
लहान मुलांसाठीही काय फायदा?
संशोधक लवकरच या रोबोटच्या मदतीने तापमानाचा विविध वयोगटांवर होणारा
परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
nफर्मने या मॉडेलवर आधारित काही छोटे रोबोट्सही बनवले आहेत. त्यांना ‘स्वेटी बेबी’ असे नाव देण्यात आले आहे. हे विशेषतः लहान मुलांची आरोग्य स्थिती समजून घेण्यास मदत करेल.
रोबोटची काय मदत?
अतिउष्णतेचा मानवी शरीरावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी हा रोबोट तयार करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या स्कूल फॉर इंजिनीअरिंग ऑफ मॅटर (ट्रान्सपोर्ट अँड एनर्जी) मधील सहयोगी प्राध्यापक कोनराड रिक्झेव्स्की यांनी सांगितले की रोबोट थंड असताना थरथर कापतो आणि कठोर परिश्रम करत असताना घाम गाळतो. म्हणजे भावना सोडल्या तर तो माणसासारखा दिसेल.