कोचीतील या दुकानात कॅशिअरच नाही! कोणीही या वस्तू घेऊन जा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 01:26 PM2018-09-10T13:26:47+5:302018-09-10T14:08:09+5:30
तुम्ही निवडलेल्या वस्तू हातातून घेऊन दुकानातून बाहेर पडायचे. तुमच्या ई वॉलेटमधून या वस्तूंचे पैसे आपोआप आणि अचूक कापले जातात. अॅमेझॉन गोच्या धर्तीवर हे दुकान उघडण्यात आले आहे.
कोची : ऐकून खरे वाटणार नाही, पण कोचीमध्ये एक दुकान असे आहे की त्या दुकानात कॅशिअरच नाही. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंचे आपोआप पैसे कापले जातात.
आपण, डीमार्ट, बिग बझार किंवा मॅक्स सारखी दालने पाहिली असतील. यामध्ये आपल्याला हव्या त्या वस्तू आपणच घ्यायच्या, मात्र, त्याचे बिल करण्यासाठी काऊंटरवर उभे राहायचे. यानंतर कॅशिअरने त्या वस्तू मोजल्या की त्याचे पैसे द्यायचे. मात्र, कोचीतील वाटासेल या दुकानात कॅशिअरच नाही. हे दुकान पूर्णत: स्वयंचलीत आहे. तुम्ही निवडलेल्या वस्तू हातातून घेऊन दुकानातून बाहेर पडायचे. तुमच्या इ वॉलेटमधून या वस्तूंचे पैसे आपोआप आणि अचूक कापले जातात. अॅमेझॉन गोच्या धर्तीवर हे दुकान उघडण्यात आले आहे.
वाटासेल या दालानाचे विपणन अधिकारी राजेश मालामाल हे दालनाबाहेर उभे राहतात. ते ग्राहकांना ही प्रणाली कशी वापरावी याबाबत माहिती देत असतात. वाटासेल हे दालन 500 स्क्वेअर फुटांमध्ये आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, कॅमेरा तंत्रज्ञान आणि सेन्सर्सचा वापर याठिकाणी केला आहे. ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर Watasale हे अॅप डाऊनलोड करून ईमेल आणि मोबाईलनंबर रजिस्टर करावा लागतो. यानंतर हे अॅप त्या ग्राहकाचा क्यूआर कोड तयार करते. हा कोड त्याचे तिकिट म्हणून काम करतो. दालनात प्रवेश करताना हा क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो.
ग्राहकाने त्याला हव्या असलेल्या वस्तू घ्यायच्या आणि दालनाच्या बाहेर पडायचे. त्याला प्रत्येक वस्तू स्कॅन करत बसायची गरज नाही. अॅप या ग्राहकाच्या खात्यातून या वस्तूंचे पैसे वजा करते. या प्रक्रियेत कुठेही रांग, स्कॅनिंग आणि कॅशिअर असत नाही, असे या दालनाचे कार्यकारी अधिकारी सुभाष एस यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी चीनच्या बिंगोबॉक्स या कंपनीने पहिल्यांदाच आपल्या दालनामध्ये ही प्रणाली बसविली होती. या कंपनीची चीनच्या 30 शहरांमध्ये 300 दालने आहेत. भारतात हायपरसिटीने असे पहिले आणि एकमेव दालन इन्फोसिटी, हैदराबादमध्ये उघडले आहे. मात्र ते तेथील कर्मचाऱ्यांसाठीच आहे. अॅमेझॉनची अमेरिकेतच तीन दालने आहेत. यानंतर भारतात अशी अद्ययावत सुविधा देणारे वाटासेल हे दुसरे दालन आहे. वाटासेलच्या या दालनात सध्या 180 वस्तू विक्रीला आहेत.
कशी चालते प्रक्रिया?
ग्राहकाने दालनात प्रवेश करताना त्याचा क्युआर कोड स्कॅन करायचा आहे. त्यानंतर या ग्राहकाने रॅकवरून ज्या वस्तू उचलल्या असतील त्या वस्तू उच्च प्रतीचे कॅमेरे टिपतात. या रॅकवरही सेन्सरही लावलेले असतात. जर ग्राहकाने एखादी वस्तू उचलून पुन्हा रॅकवर ठेवली तरीही या हालचालीची नोंद होते. ती वस्तू त्या ग्राहकाच्या यादीमध्ये नोंद होत नाही. यानंतर ग्राहक बाहेर पडताना सेन्सर आणि कॅमेरांच्या द्वारे त्याने घेतलेल्या वस्तूंचे बिल बनते आणि पैसे कापले जातात.