TikTok ने Facebook ला टाकलं मागे; २०२० मध्ये सर्वाधिक डाउनलोड झालेलं अॅप
By मोरेश्वर येरम | Published: December 10, 2020 05:21 PM2020-12-10T17:21:57+5:302020-12-10T17:31:11+5:30
'टिकटॉक' अॅपने सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या अॅप्सच्या यादीत तीन स्थानांची मजल मारली आणि अव्वल स्थान गाठलं आहे.
नवी दिल्ली
'टिकटॉक' अॅपला भारतात बंदी घालण्यात आली असली तरी या चिनी अॅपने डाउनलोड्सच्या बाबतीत मोठा रेकॉर्ड केला आहे. २०२० या वर्षात टिकटॉक अॅप सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेलं अॅप ठरलं आहे. तर फेसबुक दुसऱ्या क्रमांकावर आहे.
App Annie च्या अहवालानुसार 'टिकटॉक' अॅपने सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या अॅप्सच्या यादीत तीन स्थानांची मजल मारली आणि अव्वल स्थान गाठलं आहे. App Annie कडून दरवर्षी डिसेंबर महिन्यात संपूर्ण वर्षाभरातील अॅप्सच्या कामगिरीचा लेखाजोखा प्रसिद्ध केला जातो. या वर्षीच्या टॉप-५ अॅप्समध्ये चार अॅप्स तर फेसबुकच्याच मालकीचे आहेत.
तिसऱ्या स्थानावर व्हॉट्सअॅप (WhatsApp), चौथ्या स्थानावर झूम (Zoom) आणि पाचव्या क्रमांकावर इन्स्टाग्रामचा (Instagram) समावेश आहे. सहाव्या क्रमांकावर फेसबुकच्याच मेसेंजर अॅपचा बोलबाला आहे. यावर्षी वर्क फ्रॉम होमचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्यामुळे 'झूम' अॅपने टॉप-५ मध्ये झेप घेतली आहे.
गुगलच्या Google Meet अॅपचा सातव्या क्रमांकावर समावेश आहे. त्यापाठोपाठ स्नॅपचॅट, टेलिग्राम आणि लाइकी यांचा नंबर लागतो. जानेवारी २०२० ते नोव्हेंबर २०२० मध्ये डाउनलोड्सच्या आधारावर ही संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस अॅप स्टोअरच्या माध्यमातून ही माहिती गोळा करण्यात आली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात मोबाइलच्या वापरात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. झूम अॅपच्या डाउनलोड्समध्ये तब्बल २०० टक्क्यांची वाढ यावेळी नोंदविण्यात आली आहे.