एक चूक अन् तुमचे सिम कार्ड होणार ब्लॉक; TRAI ने आणला नवीन नियम, जाणून घ्या डिटेल्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 09:51 PM2024-08-29T21:51:06+5:302024-08-29T21:51:20+5:30
टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने फेक/फसवणुकीचे कॉल्स आणि एसएमएस थांबवण्यासाठी नवीन नियम आणले आहेत.
TRAI New Rule : टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने (Telecom Regulatory Authority of India) फेक कॉल्स आणि एसएमएस थांबवण्यासाठी एक योजना आखली आहे. ट्राय कमर्शियल कॉल्सबाबत नवीन नियम आणणार आहे, ज्यामध्ये चुका करणाऱ्यांचे थेट सिम ब्लॉक करण्याची तरतूद आहे. ट्रायने यासंबंधित 113 पानांचे पत्र जारी केले आहे, ज्यामध्ये व्यावसायिक, अर्थात मार्केटिंग कॉल्स आणि मेसेजबाबतच्या नवीन नियमांची माहिती दिली आहे. याव्यतिरिक्त, रेग्युलेटरने गेल्या दोन वर्षांतील ब्लॉक केलेल्या सिम कार्डचा डेटाही जारी केला आहे.
टेलिकॉम रेग्युलेटरने कंसल्टेशन पेपरमध्ये रजिस्टर्ड आणि अनरजिस्टर्ड टेलीमार्केटरसाठी नवीन नियम दिले आहेत, ज्याचे उल्लंघन केल्यावर दंडात्कम कारवाई किंवा सिम कार्ड ब्लॉक करण्यापर्यंतच्या तरतुदी आहेत. ट्रायच्या नव्या नियमानुसार, कोणत्याही सिमकार्डवरुन दररोज 50 हून अधिक आउटगोइंग व्हॉईस कॉल्स आणि मेसेज केल्यास त्याची चौकशी केली जाईल. तपासादरम्यान नियमांचा गैरवापर आढळल्यास सिमकार्ड ब्लॉक करण्यात येईल.
Press Release No. 59/2024 regarding Consultation Paper on "Review of the Telecom Commercial Communications Customer Preference Regulations, 2018 (TCCCPR-20 18)" .https://t.co/NVGm3BZAql
— TRAI (@TRAI) August 28, 2024
वापराची मर्यादा लागू केली जाईल
आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी ट्रायने मोठे पाऊल उचलले आहे. एका सिमकार्डवरुन अधिक कॉल आणि मेसेज आल्यास त्याची चौकशी केली जाईल. दूरसंचार नियामकाने अनोंदणीकृत टेलिमार्केटरसाठी वापराची मर्यादादेखील दिली आहे. यानुसार कोणत्याही मोबाइल नंबरवरुन (नोंदणीकृत टेलिमार्केटर) एका दिवसात जास्तीत जास्त 20 आउटगोइंग कॉल आणि 20 आउटगोइंग मेसेज केले जाऊ शकतात.
सिम कार्ड ब्लॉक केले जाईल
पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ताकीद दिली जाईल. नियमाचे दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास, वापराची मर्यादा 6 महिन्यांसाठी लागू केली जाईल. तर, नियमांचे तीन किंवा त्याहून अधिक वेळा उल्लंघन झाल्यास, दोन वर्षांपर्यंत सिम कार्ड ब्लॉक केले जाईल. तसेच, युजरला ब्लॅक लिस्ट केले जाईल.
किती सिम ब्लॉक केले?
2022 आणि 2023 या आर्थिक वर्षात 59 हजारांहून अधिक सिमकार्ड ब्लॉक करण्यात आल्याचे ट्रायने आपल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये म्हटले आहे. 2022 मध्ये एकूण 32,032 सिम कार्ड ब्लॉक करण्यात आले आहेत आणि 2023 मध्ये एकूण 27,043 सिम कार्ड ब्लॉक करण्यात आले आहेत. नियामकाने 25 सप्टेंबर 2024 पर्यंत त्यांच्या नवीन कंसल्टेशेन पेपरबाबत भागधारकांचे मत मागवले आहे.