भारतातही Twitter Blue ची आजपासून सुरुवात, दरमहा मोजावे लागणार ९०० रुपये! कसे जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 09:50 AM2023-02-09T09:50:46+5:302023-02-09T09:52:20+5:30
मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरनं (Twitter) भारतातही आता सब्सक्रिप्शन सेवा सुरू केली आहे. भारतात Twitter Blue सेवेचे शुल्क ६५० रुपयांपासून सुरू होते.
नवी दिल्ली-
मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरनं (Twitter) भारतातही आता सब्सक्रिप्शन सेवा सुरू केली आहे. भारतात Twitter Blue सेवेचे शुल्क ६५० रुपयांपासून सुरू होते. वेब युझर्सना 'ट्विटर ब्लू'साठी दरमहा ६५० रुपये, तर मोबाइल युझर्ससाठी दरमहा ९०० रुपये मोजावे लागणार आहेत.
इलॉन मस्कनं गेल्या वर्षी ४४ बिलियन डॉलरमध्ये ट्विटर खरेदी केले. त्यानंतर मस्कनं ट्विटरमध्ये अनेक बदल केले. यातच ट्विटर ब्लू सेवेची घोषणा करण्यात आली होती. या सेवेअंतर्गत युझर्सना अतिरिक्त सेवेसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
ट्विटरनं याआधी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपानसह इतर काही देशांमध्ये Twitter Blue सेवेची सुरुवात केली होती. या देशांमध्ये ट्विटर ब्लू सेवेसाठी ८ डॉलर प्रतिमहिना शुल्क आकारले जात आहे. वर्षभराचं सब्सक्रिप्शन घेतल्यास ८४ डॉलर खर्च करावे लागत आहेत. ट्विटर ३ डॉलर अतिरिक्त चार्ज आकारुन गुगलला कमीशन देणार आहे.
आता भारतातही या सेवेची सुरुवात झाली आहे. ट्विटर ब्लू सेवा घेण्यासाठी वेब युझर्सना दरमहा ६५० रुपये तर मोबाइल यूझर्सना दरमहा ९०० रुपये चार्ज केले जाणार आहेत. तर वर्षभराचं सब्सक्रिप्शन घेतलं तर ६५०० रुपये भरावे लागणार आहेत.
Twitte Blue मध्ये मिळणार कोणते फिचर्स
- ट्विटर ब्लू सब्सक्रिप्सनसोबत यूझर्सना ब्लू टीकमार्क दिला जाणार आहे. यासोबतच यूझर्सना ट्विट एडिट करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसंच 1080p व्हिडिओ अपलोड करण्याच्या सुविधेसोबतच रीडर मोडचाही अॅक्सेस मिळणार आहे.
- याशिवाय ट्विटर यूझर्सना नॉन पेड यूझर्सच्या तुलनेत कमी जाहिराती दिसतील. तसंच वेरिफाइड यूझर्सना ट्विटला रिप्लाय आणि ट्विटमध्येही प्राधान्य दिलं जाईल.
- इतकंच नाही, तर या अंतर्गत यूझर्सना ट्विटसाठी ४ हजार अक्षरांची मर्यादा मिळणार आहे.