ट्विटरच्या सीइओचा पगार तुम्हाला माहिती आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 11:50 AM2018-04-14T11:50:00+5:302018-04-14T11:50:00+5:30
ट्विटरच्या सीईओने गेल्या तीन वर्षांमध्ये घेतलेला पगार सर्वांना विचार करायला लावणारा आहे.
सॅन फ्रॅन्सिस्को- प्रत्येक देशांमध्ये असणाऱ्या मोठ्या कंपन्यांचे संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पगारांचे मोठमोठे आकडे आपल्याला बातम्यांमधून वाचायला मिळत असतात. तसेच काही आंतरराष्ट्रीय कंपन्याच्या संचालक, सीइओंचे कोट्यवधी डॉलर्सच्या पगार किंवा संपत्तीचे आकडेही प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे या मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींचे पगार नेहमी मोठेच असतात असा आपला समज असतो. पण ट्विटरच्या सीईओने गेल्या तीन वर्षांमध्ये घेतलेला पगार सर्वांना विचार करायला लावणारा आहे.
ट्विटरचे सीइओ आणि सहसंस्थापक जॅक डोर्से यांनी सलग तीन वर्षे एकही डॉलर पगार घेतलेला नाही. तसेच ट्विटरसाठी केलेल्या कोणत्याही कामाचे पैसे त्यांनी घेतलेले नाहीत.यूएस सिक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशन (एसइसी) यांना दिलेल्या निवेदनामध्ये ट्विटरचे सीइओ जॅक डोर्से यांनी 2017मध्ये कोणत्याही प्रकारचे मानधन घेतले नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. अर्थात 2018 पासून जॅक यांनी ट्विटरचे 20 टक्के समभाग घेतलेले आहेत. 2 एप्रिल रोजीची आकडेवारी लक्षात घेतली तर डोर्से यांच्याकडे ट्वीटरचे 1.8 कोटी शेअर्स होते. त्याचे मूल्य 529 दशलक्ष डॉलर्स इतके आहे. जगभरात 33 कोटी लोक ट्विटरचा वापर करतात. या वाढत्या संख्येमुळे ट्विटरला चांगले भविष्य असल्याचे बोलले जाते. डोर्से हे स्क्वेअर या पेमेंट कंपनीचेही सीइओ असून त्यामध्ये 6.5 कोटी समभाग त्यांनी घेतलेले आहेत. त्याचे मूल्य 3.1 अब्ज डॉलर्स इतके आहे.