Twitter Gold Tick Price: ट्विटरवर आता 'गोल्डन टीक'साठीही पैसे मोजावे लागणार; इलॉन मस्क दरमहा ८२,४६५ रुपये वसूल करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 01:59 PM2023-02-06T13:59:37+5:302023-02-06T14:05:13+5:30
Twitter Gold Tick Price: गेल्या वर्षी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'ट्विटर'ची सूत्रे हाती घेतल्यापासून इलॉन मस्क अनेक मोठे निर्णय घेत आहेत.
Twitter Gold Tick Price: गेल्या वर्षी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'ट्विटर'ची सूत्रे हाती घेतल्यापासून इलॉन मस्क अनेक मोठे निर्णय घेत आहेत. इलॉन मस्कने यापूर्वी ट्विटर ब्लू टिकसाठी ट्विटर युझर्सकडून पैसे आकारण्यास सुरुवात केली होती आणि आता 'गोल्ड टिक'साठी देखील कंपन्यांकडून शुल्क आकारण्याची तयारी केली जात आहे.
सोशल मीडिया कन्सल्टंट Matt Navarra यांनी ट्विट केलेल्या अहवालानुसार, आता ट्विटर गोल्ड टिक असलेल्या बिझनेस अकाऊंटमधून दरमहा १ हजार डॉलर (सुमारे ८२ हजार ४६५ रुपये) गोळा करण्याचा मानस आहे.
ट्विटसह एक स्क्रीनशॉट देखील त्यांनी शेअर केला आहे, ज्यावरून असे दिसून येते की बिझनेस अकाऊंट असलेल्यांसाठी गोल्ड टिकची किंमत दरमहा १००० डॉलर असेल, तसेच अतिरिक्त ५० डॉलर (अंदाजे ४ हजार १२३ रुपये) देखील द्यावे लागतील. या वृत्ताला टेक न्यूज साइट 'द इन्फॉर्मेशन'ने पुष्टी दिली आहे. लवकरच याबाबतचा तपशील देखील अंतिम केला जाणार आहे आणि किंमतीच्या संरचनेत देखील बदल होऊ शकतो. ट्विटर कर्मचार्यांनी पाठवलेल्या मेलच्या स्क्रीनशॉटनुसार, या नवीन प्रस्तावाला संस्थांसाठी व्हेरिफाईड म्हटले जाईल. सध्या ही सेवा सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू होणार आहे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
ट्विटर बिझनेसच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करून अशी माहिती देण्यात आली आहे की आम्ही लवकरच कंपन्यांसाठी व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू करणार आहोत. पूर्वी ब्लू फॉर बिझनेस म्हणून ओळखले जाणारे, आज आमच्या वेटलिस्टद्वारे अर्ज करू शकतात, असंही नमूद करण्यात आलं आहे. सर्वप्रथम, ट्विटर यूझर्ससाठी ब्लू टिकच्या सशुल्क सेवेअंतर्गत, मासिक खर्च ८ डॉलर (सुमारे ६५९ रुपये) पासून सुरू होतो जो ११ डॉलर (सुमारे ९०७ रुपये) पर्यंत जातो.