दर महिना ६६० रुपये भरा अन् मिळवा Twitter वर ब्ल्यू टिक; जर DP बदलला तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 09:57 AM2022-12-12T09:57:38+5:302022-12-12T09:58:21+5:30
सब्सक्रिप्शन घेतलेल्या यूजर्संना प्राधान्य मिळेल आणि सामान्य यूजर्सच्या तुलनेत ब्ल्यू टिक यूजर्संना ५० टक्के कमी जाहिराती दाखवल्या जातील.
नवी दिल्ली - बहुचर्चित सोशल मीडिया अॅप ट्विटर त्यांच्या यूजर्ससाठी ब्ल्यू टिक सब्सक्रिप्शन पॅकेज लॉन्च करणार आहे. सोमवारी ही सर्व्हिस लॉन्च झाल्यानंतर यूजर्सला पैसे देऊन ब्ल्यू टीक मिळेल. त्याचसोबत या यूजर्संना कंटेंट एडिटसोबत अन्य सुविधाही उपलब्ध होतील. मात्र Apple Ios यूजर्ससाठी ही सुविधा महाग असेल. १२ डिसेंबर म्हणजे आजच ही सुविधा Twitter कडून लॉन्च करण्यात येणार आहे.
हे पॅकेज ८ डॉलर प्रति महिना तर आयफोनसाठी ११ डॉलर प्रति महिना असेल. ट्विटरकडून यूजर्सच्या अकाऊंटबाबत आढावा घेतला जाईल. केवळ व्हेरिफाईड फोन नंबर असणाऱ्यांनाच ही सुविधा मिळेल. त्यासाठी ट्विटरचे कर्मचारी तुमच्या अकाऊंटची पडताळणी करतील. ट्विटर प्रोडक्ट मॅनेजर एस्थर क्रॉफर्ड म्हणाले की, आम्ही कुठल्याही बनावट प्रकाराला आळा घालण्यासाठी काही नवीन पाऊलं उचलली आहेत. कुठल्याही यूजर्सला ब्ल्यू टिक देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या खात्याची तपासणी केली जाईल असं ते म्हणाले.
व्हेरिफिकेशननंतर यूजर्सला ब्ल्यू टिक दिला जाईल. त्यांना आपल्या ट्विटसमधील कंटेन्ट एडिट करण्याचा अधिकारही मिळू शकेल. परंतु हा कालावधी ३० मिनिटांचा असेल. ट्विट केल्यापासून ३० मिनिटांच्या आत तुम्हाला एडिट करता येईल. १०८० पी व्हिडिओही अपलोड करू शकाल. शब्दांची मर्यादाही वाढवली असून मोठे ट्विट करू शकणार आहेत. सब्सक्रिप्शन घेतलेल्या यूजर्संना प्राधान्य मिळेल आणि सामान्य यूजर्सच्या तुलनेत ब्ल्यू टिक यूजर्संना ५० टक्के कमी जाहिराती दाखवल्या जातील.
फोटो अथवा नाव बदलताच ब्ल्यू टीक हटवणार
विशेष म्हणजे, जर कुठल्याही यूजर्सने त्यांच्या प्रोफाईलवरील नाव अथवा फोटो बदलल्यास त्यांचे ब्ल्यू टिक हटवले जाईल. त्यानंतर व्हेरिफिकेशन करून ब्ल्यू टिक दिला जाईल. कंपनी अशा यूजर्सवर सक्ती करण्यासाठी काही फिचर लॉन्च करणार आहे. जे एखादं विशिष्ट कॅम्पेन किंवा विरोधासाठी प्रोफाईल फोटो अथवा नाव बदलतात. बहुतांश ट्विटर अकाऊंटनं माहिती देताना सांगितले की, सब्सक्राइबर त्यांचे हँडल, डिस्प्ले नाव आणि प्रोफाईल फोटो बदलू शकतात परंतु जर त्यांनी असे केले तर तात्पुरते त्यांचे ब्ल्यू टिक हटवले जाईल. त्यानंतर त्यांचे अकाऊंट पुन्हा व्हेरिफिकेशन करून ब्ल्यू टिक दिला जाईल.
Twitter वर अनेक प्रयोग
इलॉन मस्क यांनी मागील महिन्यात कंपनी टेकओव्हर केली होती. त्यानंतर सातत्याने ट्विटरमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. त्यात ट्विटर सब्सक्रिप्शनसाठी महिन्याला ८ डॉलर शुल्क आकारले जात आहे. पैसे देऊन ब्ल्यू टिक अनेक बनावट खात्यांनाही दिले गेले. त्यामुळे त्यांच्या अकाऊंटवरील चुकीचे ट्विटही कंपनीचे मानले गेले. अनेक कंपन्यांना त्यामुळे नुकसान सहन करावे लागले. ते पाहता कंपनीला ब्ल्यू सब्सक्रिप्शन फिचर थांबवायला लागले. आता पुन्हा नव्याने ट्विटर हे फिचर लॉन्च करत आहेत.