एलॉन मस्कच्या Twitter ने बदलला लोगो, निळा पक्षी भुर्रर्रर्र उडाला.... X ने घेतली जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 09:30 PM2023-07-24T21:30:15+5:302023-07-24T21:32:53+5:30
ट्विटरच्या अधिकृत हँडलचे नावदेखील बदलण्यात आले आहे.
Twitter New Logo: ट्विटर आता X म्हणून ओळखले जाईल. यासोबतच ट्विटरच्या अधिकृत हँडलवर (@Twitter) लोगो बदलण्यात आला आहे. यासोबतच नाव बदलून X असे करण्यात आले आहे. मात्र, मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर फक्त जुना लोगो दिसत आहे. ट्विटरच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनीही ट्विट करून एक्स नावाची माहिती दिली. जुन्या लोगोमध्ये निळ्या रंगाचा पक्षी वापरण्यात आला होता, मात्र आता काळ्या रंगाचे X चे चिन्ह वापरले आहे.
— Elon Musk (@elonmusk) July 23, 2023
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून या प्लॅटफॉर्मवर अनेक बदल करण्यात आले आहेत. पण नाव आणि लोगो बदलणे हा आजवरचा सर्वात मोठा निर्णय आहे. लिंडा याकारिनो यांनी ट्विट केले की, कॅमेरा प्रमाणे एक्स, यासोबतच तिने इमारतीवरील एक्स लोगोच्या प्रकाशाचाही उल्लेख केला. मस्कचे एक्स या अक्षरावर जुने प्रेम आहे. या वर्षी एप्रिलमध्ये, एलॉन मस्क यांनी लिंडा याकारिनो यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यांचे स्वागत करताना, मस्क यांनी ट्विट केले होते की ते या प्लॅटफॉर्मचे X, एव्हरीथिंग अॅपमध्ये रूपांतर करण्यासाठी लिंडासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. त्यावेळीच याबद्दलचे संकेत मिळाले होते.
ट्विटर मुख्यालयावर नवीन लोगो
Our headquarters tonight pic.twitter.com/GO6yY8R7fO
— Elon Musk (@elonmusk) July 24, 2023
ट्विटरमध्ये आणखी अनेक सेवा देण्याची योजना सध्या मस्क यांच्या डोक्यात आहे. ट्विटरमध्ये अनेक नवीन बदल होणार आहेत, ज्याबद्दल आधीच सूचित करण्यात आले आहे. मस्कने X प्लॅटफॉर्मबाबत मोठी तयारी केली आहे आणि आणखी अनेक सेवाही आणत आहेत. या वर्षी एप्रिलमध्येच ट्विटरने आपल्या पार्टनरसोबत अधिकृत डीलसाठी एक्स कॉर्पचे नाव वापरले होते. मस्क यांनी एका दिवसापूर्वीच नवीन नावाचा टीझर रिलीज केला होता. त्याने फोटो ज्या नावाने पोस्ट केला होता तेही त्याने सूचित केले होते. एलॉन मस्कची Space X नावाची कंपनीदेखील आहे.