आता ट्विटरद्वारे सुद्धा करता येणार कमाई, कंटेंट क्रिएटर्सवर मिळतील पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 01:40 PM2023-06-10T13:40:53+5:302023-06-10T13:41:18+5:30
ट्विटरद्वारे व्हेरिफाइड कंटेंट क्रिएटर्सला लवकरच पैसे दिले जातील, असे इलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे.
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटरद्वारे व्हेरिफाइड कंटेंट क्रिएटर्सला लवकरच पैसे दिले जातील, असे इलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता ट्विटरवर फक्त इलॉन मस्क हेच कमावणार नाहीत, तर लोकही कमावतील.
आपला मुद्दा स्पष्टपणे मांडताना इलॉन मस्क म्हणाले की, जे कोणी व्हेरिफाइड कंटेंट क्रिएटर्स असतील, त्यांना रिप्लायमध्ये दिसणार्या जाहिरातींचे पैसे मिळतील. इतकेच नाही तर पहिल्या ब्लॉकमध्ये ट्विटरद्वारे क्रिएटर्सला 5 मिलियन डॉलर (सुमारे 41 कोटी रुपये) दिले जातील, असेही इलॉन मस्क यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत कंटेंट क्रिएटर्स इन्स्टाग्राम आणि फेसबुक या मेटा प्लॅटफॉर्मद्वारे कमाई करत होते, परंतु आता ट्विटर देखील क्रिएटर्सना त्यांच्या सर्वोत्तम कामासाठी पैसे देईल. इलॉन मस्क यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या ट्विटनुसार, इलॉन मस्क यांनी एक अट घातली आहे. यात ज्यांचे अकाउंट व्हेरिफाइड झाले आहे, केवळ त्याच कंटेंट क्रिएटर्सना पेमेंट मिळेल.
तसेच, जेव्हा व्हेरिफाईड अकाउंटवर जाहिरात येईल, तेव्हाच पेमेंट केले जाईल.याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे ब्लू टिक असेल आणि तुम्ही कंटेंट क्रिएटर देखील असाल तर तुम्ही देखील लवकरच Twitter द्वारे कमाई करू शकाल. मात्र, जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल पण तुम्ही इलॉन मस्क यांनी लाँच केलेल्या ट्विटरची ब्लू मेंबरशिप घेतली नसेल, तर तुम्हाला पैसे कमवण्याची संधी मिळणार नाही.
जर तुम्हालाही ट्विटरवरून कमाई करायची असेल, तर तुम्ही ब्लू टिकचे पेड सब्सक्रिप्शन खरेदी करून पैसे कमवण्याच्या संधीचा लाभ घेऊ शकता.