सोनीचे एक्सपेरिया मालिकेत दोन स्मार्टफोन
By शेखर पाटील | Published: February 27, 2018 06:09 PM2018-02-27T18:09:56+5:302018-02-27T18:09:56+5:30
सोनी कंपनीने एक्सपेरिया एक्सझेड २ आणि एक्सपेरिया एक्सझेड२ कॉम्पॅक्ट हे दोन अतिशय दर्जेदार फिचर्सनी सज्ज असणार्या स्मार्टफोनचे अनावरण केले आहे.
सोनी कंपनीने एक्सपेरिया एक्सझेड २ आणि एक्सपेरिया एक्सझेड२ कॉम्पॅक्ट हे दोन अतिशय दर्जेदार फिचर्सनी सज्ज असणार्या स्मार्टफोनचे अनावरण केले आहे.
बार्सिलोना शहरात सुरू झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये विविध कंपन्यांनी आपापल्या नवीन उत्पादनांना जगासमोर प्रदर्शीत करण्यास प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने सोनी कंपनीने एक्सपेरिया एक्सझेड २ आणि एक्सपेरिया एक्सझेड२ कॉम्पॅक्ट या दोन फ्लॅगशीप स्मार्टफोन्सचे अनावरण केले आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये डिस्प्लेच्या आकाराचा फरक वगळता सर्व फिचर्स समान आहेत. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे उत्तम दर्जाचे कॅमेरे होत. या दोन्ही मॉडेल्समध्ये मागील बाजूस १९ मेगापिक्सल्सचा मोशन आय कॅमेरा देण्यात आला आहे. यात ऑटो-फोकस, एलईडी फ्लॅश, ८ एक्स क्षमतेचा डिजीटल झूम, स्टेडी शॉट आदी विविध फिचर्सचा समावेश आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे हा कॅमेरा फोर-के एचडीआर क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यास सक्षम आहे. अशा प्रकारची सुविधा असणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन असल्याची विशेष बाब सोनी कंपनीने नमूद केली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात स्टेडीशॉट या फिचरने सज्ज असणारा ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे.
सोनी एक्सपेरिया एक्सझेड २ आणि एक्सपेरिया एक्सझेड२ कॉम्पॅक्ट या दोन्ही मॉडेल्समध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते ४०० जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. हे दोन्ही मॉडेल्स अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहेत. या दोन्ही मॉडेल्समध्ये काही प्रमाणात फरक आहे. एक्सपेरिया एक्सझेड २ या मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे १०८० बाय २१६० पिक्सल्स क्षमतेचा ट्राय ल्युमिनस एचडीआर डिस्प्ले दिलेला आहे. यात सोनी कंपनीचे एक्स-रिअॅलिटी डिस्प्ले इंजिन देण्यात आले आहे. तर सोनी एक्सपेरिया एक्सझेड २ कॉम्पॅक्ट या मॉडेलमध्ये याच प्रकारातील मात्र ५ इंच आकारमानाचा डिस्ले असेल. सोनी एक्सपेरिया एक्सझेड२ या मॉडेलमधील बॅटरी ३१८० मिलीअँपिअरची तर एक्सपेरिया एक्सझेड २ कॉम्पॅक्टमध्ये २८७० मिलीअँपिअरची बॅटरी असेल. दोन्हीमध्ये क्विकचार्ज ३.० तंत्रज्ञानाचा सपोर्ट देण्यात आला आहे. पुढील महिन्यात हे दोन्ही मॉडेल्स ग्राहकांना प्रत्यक्षात मिळतील असे सोनी कंपनीने जाहीर केले आहे.