अल्टीमेट इअर्स कंपनीचा मेगाबूम वायरलेस स्पीकर
By शेखर पाटील | Published: November 21, 2017 06:30 PM2017-11-21T18:30:00+5:302017-11-21T18:30:00+5:30
अल्टीमेट इअर्स या अमेरिकन कंपनीने आधी भारतीय बाजारपेठेत बूम हा स्पीकर सादर केला होता. आता याचीच पुढील आवृत्ती मेगाबूमच्या माध्यमातून लाँच करण्यात आली आहे
अल्टीमेट इअर्स कंपनीने आपल्या मेगाबूम हा प्रिमीयम वायरलेस स्पीकर लाँच करण्याची घोषणा केली आहे.
अल्टीमेट इअर्स या अमेरिकन कंपनीने आधी भारतीय बाजारपेठेत बूम हा स्पीकर सादर केला होता. आता याचीच पुढील आवृत्ती मेगाबूमच्या माध्यमातून लाँच करण्यात आली आहे. नावातच नमूद असल्यानुसार हा स्पीकर उच्च ध्वनीसाठी विकसित करण्यात आला आहे. विशेष करून आऊटडोअर पार्टीजसाठी याचा वापर करणे शक्य असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात गुगल असिस्टंट आणि सिरी या दोन्ही व्हाईस कमांडवर आधारित प्रणालींचा सपोर्ट देण्यात आला आहे. परिणामी कुणीही याला अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोनला कनेक्ट करून ध्वनी आज्ञावलीवर आधारित विविध फंक्शन्स कार्यान्वित करू शकतो. यात ३६० अंशातील हाय-रेझोल्युशन ध्वनीची निर्मीती होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. अर्थात या माध्यमातून अतिशय उत्तम दर्जाच्या ध्वनीची अनुभुती घेता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याला कुणीही आपला स्मार्टफोन कनेक्ट करू शकतो. तसेच याच्या कार्यान्वयासाठी स्वतंत्र अॅपदेखील सादर करण्यात आले आहे.
मेगाबूम हा वायरलेस स्पीकर आयपीएक्स७ या मानकावर आधारित म्हणजेच वॉटरप्रूफ आहे. यामुळे याला पावसातही वापरणे शक्य आहे. तसेच यातील बॅटरी उत्तम दर्जाची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर दीर्घ काळापर्यंत टिकत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच यातील ब्ल्यु-टुथची रेंजही अन्य मॉडेल्सच्या तुलनेत चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे. मेगाबूम वायरलेस स्पीकर भारतीय ग्राहकांना १९,९९५ रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत आता अनेक वायरलेस स्पीकर लाँच करण्यात आली असून यात सातत्याने भर पडत आहे. मात्र यातील बहुतांश मॉडेल्स हे अत्यंत किफायतशीर दरातील आहेत. काही स्पीकर तर अगदी हजार रूपयांपासून उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमिवर मेगाबूम हे मॉडेल प्रिमीयम या प्रकारातील असल्यामुळे याला नेमका कसा प्रतिसाद लाभतो याकडे लक्ष लागून आहे.