आयफोनलाही लाजवेल...! एवढी छोटी स्मार्ट रिंग १८ कॅरेट सोन्याने बनविली, किडनी विकावी नाही लागली म्हणजे झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:55 IST2025-01-08T13:55:03+5:302025-01-08T13:55:30+5:30
Expensive Smart Ring: स्मार्ट रिंग या हातातील अंगठीसारख्याच आहेत. परंतू, त्या आजवर अन्य धातूमध्ये, प्लॅस्टिकमध्ये मिळत होत्या.

आयफोनलाही लाजवेल...! एवढी छोटी स्मार्ट रिंग १८ कॅरेट सोन्याने बनविली, किडनी विकावी नाही लागली म्हणजे झाले
लास वेगासमधील कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये एकसोएक फिचर्स असलेली गॅजेट्स लाँच केली जात आहेत. या शोमध्ये तर सोनी आणि होंडाने मिळून बनविलेली ईलेक्ट्रीक कारही लाँच करण्यात आली आहे. या शोमध्ये आणखी एका गोष्टीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती म्हणजे स्मार्ट रिंगने.
स्मार्ट रिंग या हातातील अंगठीसारख्याच आहेत. परंतू, त्या आजवर अन्य धातूमध्ये, प्लॅस्टिकमध्ये मिळत होत्या. आता त्या सोने आणि चांदीने बनविण्यात आल्या आहेत. बंगळुरुच्या स्टार्टअपने एक लक्झरी स्मार्ट रिंग सादर केली आहे. ही रिंग हॉलमार्कच्या सोने, चांदीने बनविण्यात आली आहे.
अल्ट्राह्यूमन रेयर असे या कंपनीचे नाव असून या रिंगमध्ये फोटोप्लेथिस्मोग्राफी (PPG), सिक्स-एक्सिस मोशन सेंसर, हार्ट रेट ट्रॅकर आणि स्लीप इंडिकेटर फिचर्स आहेत. आता एवढ्यासाठी कोण कशाला ही रिंग घेईल, कोणी गिफ्ट केली तर, असा विचार करत असाल ना, मग किंमतही पहा.
अल्ट्राह्युमन रेअरची किंमत GBP 1,500 (अंदाजे रु. 1,61,000) पासून सुरू होते आणि GBP 1,800 (अंदाजे रु. 1,93,000) पर्यंत जाते. ही भारतीय कंपनी असली तरी ही महागडी रिंग पॅरिस व लंडनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहे. डेझर्ट रोझ, डेझर्ट स्नो आणि ड्यून अशा तीन फिनिशमध्ये ती उपलब्ध केली जाणार आहे.
डेजर्ट रोज आणि ड्यून फिनिश या रिंग 18 कॅरेट रोज गोल्ड आणि 18 कॅरेट गोल्डमध्ये बनविण्यात आलेली आहे. डेजर्ट स्नो ही 95% प्लॅटिनममध्ये बनविण्यात आली आहे.