CoWIN डेटा लीक प्रकरणाची केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केली चौकशी, सत्य काय ते सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 03:42 PM2021-06-12T15:42:26+5:302021-06-12T15:43:37+5:30
कोरोना लसीकरणासाठी तयार करण्यात आलेले CoWin हे डिजिटल व्यासपीठ हॅक करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या काही पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या.
कोरोना लसीकरणासाठी तयार करण्यात आलेले CoWin हे डिजिटल व्यासपीठ हॅक करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या काही पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या. केंद्र सरकारनं याची दखल घेऊन संबंधित सर्व दावे खोटे आणि निराधार असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
कोविन अॅपमधून डेटा लीक होत असल्याची माहिती सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एम्पावर्ड ग्रूप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशननं (EGVAC) याबाबत चौकशी करण्याच्या मागणीनं जोर धरला होता. अखेर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत एक पत्रक जारी करुन सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
#COVID19 Vaccination Update
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) June 12, 2021
➡️Union Health Ministry & Chairman, Empowered Group on Vaccine Administration (EGVAC) confirm that claim of so-called hackers on dark web relating to alleged data leak is baseless.https://t.co/F9AhAcXQ93@PMOIndia@drharshvardhan@rssharma3pic.twitter.com/wltxSlt2VM
CoWIN सिस्टमची माहिती डार्क वेबवर लीक करण्यात आल्याचा दावा पूर्णपणे खोटा असून आरोग्य मंत्रालय आणि एम्पावर्ड ग्रूप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशन याचा पूर्णपणे तपास केला आहे. CoWIN मधून कोणताही डेटा लीक झालेला नाही, असं ट्विट केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. याउलट कोविनच्या तांत्रिक प्रणालीवर २४ तास नजर ठेवली जात असून सातत्यानं कोविनच्या सुरक्षीततेबाबत माहिती घेतली जात असते. जेणेकरुन प्रत्येक युझरचा डेटा सुरक्षित राहू शकेल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
CoWIN सिस्टमच्या कथिक हॅक होण्याच्या वृत्ताची दखल घेऊन इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्राद्योगिकी मंत्रलयानं कॉम्प्युटर इमरजंसी रिस्पॉन्स टीमच्या माध्यमातून याची तपासणी करण्यात आली. यात CoWIN पूर्णपणे सुरक्षित असल्याचं निदर्शनास आलं आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
"CoWIN सिस्टम हॅक होणं आणि डेटा लीकवरुन डार्क वेबवर अस्तित्वात असलेल्या कथिक हॅकर्सचे दावे आधारहीन आहेत. आम्ही सातत्यानं कोविनच्या सुरक्षेबाबत काळजी घेत असतो", असं एम्पावर्ड ग्रूप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशनचे चेअरमन डॉ. आर.एस.शर्मा यांनी सांगितलं.
दरम्यान, ९ जून रोजी ट्विटर आणि इतर सोशल मीडिया माध्यमांमध्ये CoWIN सिस्टमचा डेटा लीक झाल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. यात युझरचा फोन नंबर, नाव, इमेल इत्यादी माहिती लीग झाल्याचं सांगण्यात येत होतं.