UPI 123PAY: आता फीचर फोनमधून पाठवता येणार पैसे, RBIने आणली खास सुविधा; जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 04:24 PM2022-09-29T16:24:47+5:302022-09-29T16:24:47+5:30
RBIने फीचर फोनमधून बँक खात्यात पैसे पाठवण्याची सुविधा सुरू केली आहे, यासाठी इंटरनेटची गरज पडणार नाही.
UPI 123PAY: रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नुकतेच UPI Lite लाँच केले. पासवर्डशिवाय 200 रुपयांपर्यंतच्या छोट्या रकमेसाठी हे खास अॅप लॉन्च करण्यात आले. यानंतर आता UPI चे आणखी एक व्हर्जन, 123Pay (UPI 123PAY) आणले आहे. याद्वारे फीचर फोनमधून(साधा कॉलिंग फोन) पेमेंट करता येणार आहे.
आरबीआयने केले लॉन्च
आरबीआयने UPI Lite आणि UPI123pay लॉन्च केले आहे. पण, या दोन्हीबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नुसार, UPI Lite ला सध्या इंटरनेटची आवश्यकता आहे तर UPI123pay ला इंटरनेटची आवश्यकता नाही. UPI123pay खास फीचर फोनसाठीच तयार करण्यात आले आहे.
UPI123pay का लॉन्च केले
देशातील कॅश(रोख) आधारित व्यवहार कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने UPI तंत्रज्ञन सुरू केले. याद्वारे थेट बँक खात्यांमधून पैशांचा व्यवहार होतो. UPIवर ग्राहकांना बँकेशी संबंधित इतर माहितीही मिळते. पण, यासाठी स्मार्टफोनची गरज आहे. पण, देशातील मोठी लोकसंख्या स्मार्टफोनपासून अजूनही वंचित आहे. यामुळेच रिझर्व्ह बँकेने UPI123pay लाँच केले आहे.
UPI123pay काय आहे?
स्मार्टफोनसोबतच आता लोक त्यांच्या फीचर फोनवरून सर्व प्रकारचे UPI व्यवहार करू शकतात. यासाठी खालील स्टेप फॉलो कराव्या लागतील.
1. प्रथम तुमचे बँक खाते UPI123pay शी लिंक करावे लागेल. यासाठी IVR क्रमांकावर (08045163666, 08045163581 किंवा 6366200200) कॉल करा.
2. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून UPI पिन तयार करा.
3. आता आयव्हीआर नंबरवर कॉल करून मनी ट्रान्सफर, एलपीजी बिल किंवा वीज बिल यासारख्या सेवांचा पर्याय निवडा.
4. पैसे पाठवण्यासाठी पुढील व्यक्तीचा फोन नंबर अॅड करण्यापूर्वी कोणती सुविधा हवी आहे, हे निवडणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला रक्कम आणि पिन टाकावा लागेल.
5. यानंतर तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील आणि संबंधित व्यक्तीच्या खात्यात ट्रांसफर केले जातील.