युएसबी ३.२ ठरणार गतीमान माहितीच्या वहनासाठी उपयुक्त
By शेखर पाटील | Published: August 8, 2017 04:49 PM2017-08-08T16:49:56+5:302017-08-08T17:28:46+5:30
युएसबी ३.२ या नवीन मानकाची घोषणा करण्यात आली असून याच्या मदतीने अत्यंत गतीमान पध्दतीने माहितीचे आदान-प्रदान शक्य होणार आहे.
युएसबी ३.२ या नवीन मानकाची घोषणा करण्यात आली असून याच्या मदतीने अत्यंत गतीमान पध्दतीने माहितीचे आदान-प्रदान शक्य होणार आहे. विविध कंपन्यांचा समावेश असणार्या युएसबी ३.० प्रमोटर ग्रुपतर्फे युएसबी ३.२ या कनेक्टरच्या आगमनावर आता शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. खरं तर अलीकडच्या काळात युएसबी टाईप-सी हा प्रकार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेला आहे. याच्या दोन्ही बाजूंना कनेक्टव्हिटीची सुविधा असून ते विविध उपकरणांमध्ये चार्जींगसह माहितीच्या वहनासाठी वापरले जाते. हेडफोन जॅकला पर्याय म्हणूनही उपयुक्त ठरले आहे. आणि आता याचीच आधुनिक आवृत्ती असणार्या युएसबी ३.२ची घोषणा करण्यात आली असून हे माहितीच्या अत्यंत गतीमान आदान-प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यात आधीच्या म्हणजेच युएसबी ३.१ पेक्षा दुप्पट गतीने माहितीचे वहन केले जाते. आधीच्या मानकात ५ जीबीच्या दोन मार्गांमधून १० जीबी इतक्या गतीने डाटा वहन होते. तर युएसबी ३.२ या मध्ये १० जीबी क्षमतेचे दोन मार्ग (लेन) देण्यात आले असून अर्थातच याच्या मदतीने २० जीबी प्रति सेकंद इतक्या गतीने माहितीचे आदान-प्रदान होऊ शकते. म्हणजेच आधीच्या मानकापेक्षा हे दुप्पट गतीमान आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे कनेक्टर युएसबी टाईप-सी केबलच्याच मदतीने माहितीचे वहन करू शकेल.
सध्या विविध उपकरणांच्या स्टोअरेजच्या क्षमतेच मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या अनुषंगाने माहितीच्या वहनाचा वेगदेखील वाढणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने युएसबी ३.२ या मानकाचे कनेक्टर अतिशय महत्वपूर्ण आणि खरं तर काळाची गरज आहे. अर्थात याचा वापर करण्यासाठी याच्याशी सुसंगत अशा उपकरणांची आवश्यकता भासणार आहे. आता युएसबी ३.२ची घोषणा झाल्यानंतर आगामी स्मार्टफोनादी उपकरणांमध्ये याची कनेक्टीव्हिटी देण्यात येईल हे स्पष्ट झाले आहे.