नेटवर्क नसलं तरी आता वाय-फायच्या सहाय्याने लँडलाइन, मोबाइल नंबरवर कॉल करणं होणार शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 02:23 PM2018-05-02T14:23:38+5:302018-05-02T14:23:38+5:30
मोबाइल नेटवर्क नसलं तरी तुम्हाला लँडलाइन तसंच मोबाइल फोनवर कॉल करणं शक्य होणार आहे.
नवी दिल्ली- बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी आपण असल्यावर तिथे नेटवर्क मिळत नाही. महत्त्वाचा फोन करायचा असतानाही नेटवर्क गेल्याच्या समस्या आपण सगळेच अनुभवतो. पण आता या सगळ्या समस्यांवर उत्तर मिळणार आहे. मोबाइल नेटवर्क नसलं तरी तुम्हाला लँडलाइन तसंच मोबाइल फोनवर कॉल करणं शक्य होणार आहे. केंद्र सरकार लवकरच देशभरात इंटरनेट टेलिफोनीला मान्यता देणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्राकडून स्विकारला जाणार आहे.
ज्या टेलिकॉम कंपन्यांकडे टेलिफोनीचे लायसन्स असणार आहेत, अशा कंपन्याकडे ही सेवा उपलब्ध असेल. टेलिफेनीचं लायसन्स असणारी टेलिकॉम कंपनी ग्राहकांना नवा मोबाइल नंबर ऑफर करेल. या मोबाइल क्रमांकासाठी तुम्हाला कोणतंही सिमकार्ड घेण्याची गरज लागणार नाही. इंटरनेट टेलिफोनी अॅप डाऊनलोड करत तुम्ही तुमचा क्रमांक अॅक्टिव्हेट करु शकता. ट्रायच्या नियामक मंडळाने गेल्या ऑक्टोबर महिन्यात यासंबंधी प्रस्ताव मांडला होता. नेहमी कॉल ड्रॉपच्या समस्येला सामोरं जावं लागणाऱ्या ग्राहकांना संपर्क साधण्यासाठी एक नवा पर्याय मिळावा यादृष्टीने ट्रायकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
दूरसंचार आयोगाने मंजूर केलेल्या प्रस्तावानंतर आता एअरटेल, रिलायन्स जिओ, बीएसएनएल, एअरटेल आणि इतर अशा टेलिकॉम कंपन्या इंटरनेट टेलिफोनी सुरू करू शकतात. टेलिफोनी सर्व्हिस सुरू केल्याचा फायदा ग्राहकांना होणार असून कनेक्टिव्हिटीसाठी नवे पर्याय आता ग्राहकांना मिळतील, असं ट्रायचे सल्लागार अरविंद कुमार यांनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणी नेटवर्क नीट नाही, अशा वेळी ही सर्व्हिस फायद्याची ठरणार आहे. ज्या इमारती आणि घरांमध्ये व्यवस्थित नेटवर्क येत नाही, अशांनाही या सेवेचा फायदा होइल, असंही अरविंद कुमार यांनी म्हंटलं.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेट टेलिफोनीचा वापर करण्यासाठी ग्राहकाला ऑपरेटरकडून सांगण्यात आलेलं अॅप डाऊनलोड करावं लागेल. यानंतर ग्राहकाला १० आकडी क्रमांक मिळेल. हा क्रमांक मोबाइल क्रमांकाप्रमाणेच असेल. उदाहरणार्थ जर तुम्ही आत्ता एअरटेलचं सिमकार्ड वापरत असाल आणि इंटरनेट टेलिफोनीसाठी रिलायन्स जिओ हवं असेल तर तुम्हाला जिओ इंटरनेट टेलिफोनी अॅप डाऊनलोड करावं लागेल. यासाठी तुम्हाला नवीन मोबाइल क्रमांक मिळेल. याच क्रमांकावरुन तुम्ही ब्रॉडबॅण्डचा वापर करत कॉल करता येइल. पण जर तुम्ही आत्ता ज्या कंपनीचं सिमकार्ड वापरत आहात व त्याच कंपनीचं अॅप डाऊनलोड केलं तर तुम्हाला तुमच्याच मोबाइलनंबर सुविधा वापरता येईल.
एखाद्या भागात एका विशिष्ट कंपनीचं नेटवर्क असतं तिथे इतर कुठलीही नेटवर्क नसतात. अशा ठिकाणी टेलिफोनी सर्व्हिसचा जास्त फायदा होणार आहे.