या दोन स्मार्टफोन्समध्ये डाटा पॅकशिवाय इंटरनेट वापराची मिळणार सुविधा!
By शेखर पाटील | Published: April 3, 2018 02:56 PM2018-04-03T14:56:58+5:302018-04-03T14:56:58+5:30
हाईक या भारतीय मॅसेंजरने विकसित केलेले टोटल अॅप इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे.
डाटा पॅकशिवाय इंटरनेटचा वापर करण्याची आपण कल्पना करू शकणार नाही. तथापि, इंटेक्स कंपनीने याच प्रकारची सुविधा असणारे दोन स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत.
इंटेक्स कंपनीने आपले अॅक्वा लॉयन्स एन १ आणि अॅक्वा लॉयन्स टी १ लाईट हे दोन स्मार्टफोन नव्याने बाजारपेठेत सादर केले आहेत. यात हाईक या भारतीय मॅसेंजरने विकसित केलेले टोटल अॅप इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे. टोटल अॅप इंटरनेट नसतांनाही कार्य करते. याच्या माध्यमातून मॅसेजिंग, बातम्या, हवामानासह विविध अलर्टस्, क्रिकेटचा स्कोअर, दैनंदिन ज्योतिष्य आदींसह विविध रिचार्जदेखील करता येतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यावरून विविध आर्थिक व्यवहारदेखील शक्य आहेत. या अॅपसाठी अँड्रॉइड प्रणालीची विशेष आवृत्ती वापरण्यात आली आहे. याचा वापर करण्यासाठी मोबाईल क्रमांकाच्या मदतीने सिंगल लॉगीनची सुविधा दिलेली असेल. विशेष म्हणजे हे अॅप अवघे १ मेगाबाईट आकारमानाचे आहे. टोटल हे अॅप अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंटरी सर्व्हीस डाटा म्हणजेच युएसएसडी या तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात इंटरनेटविना फक्त जीएसएम नेटवर्कवर संदेशांची देवाण-घेवाण करता येते.
इंटेक्स अॅक्वा लायन्स एन१ या मॉडेलमध्ये चार इंची डब्ल्यूव्हिजीए (८०० बाय ४८० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील मुख्य कॅमेरा २ मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा ०.३ मेगापिक्सल्सचा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे.
तर इंटेक्स अॅक्वा लॉयन्स टी १ लाईट या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए (८५४ बाय ४८० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले आहे. याची रॅम १ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यात २२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. यामध्ये ड्युअल एलईडी फ्लॅशसह ५ व २ मेगापिक्सल्स क्षमतांचे अनुक्रमे मुख्य व फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. एयरटेलच्या कॅशबॅक ऑफरच्या अंतर्गत इंटेक्स लॉयन्स एन१ हा स्मार्टफोन २८२३ तर लॉयन्स टी १ लाईट हे मॉडेल ३,८९९ रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.