मराठीतून करा गुगल ट्रान्सलेटचा ऑफलाईन वापर !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 07:03 PM2018-04-24T19:03:57+5:302018-04-24T19:03:57+5:30
गुगलने आपल्या गुगल ट्रान्सलेट या अॅपच्या ऑफलाईन वापराचा विस्तार करत यात मराठीसह एकूण सात भारतीय भाषांचा समावेश केला आहे.
मुंबई - गुगलने आपल्या गुगल ट्रान्सलेट या अॅपच्या ऑफलाईन वापराचा विस्तार करत यात मराठीसह एकूण सात भारतीय भाषांचा समावेश केला आहे. गुगलने आधीच इंग्रजी व हिंदी भाषांसाठी आपली गुगल ट्रान्सलेट ही सेवा ऑफलाईन वापरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या अॅपच्या ताज्या अपडेटच्या माध्यमातून याचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये आता मराठीसह तामिळ, तेलगू, कन्नड, गुजराथी, बंगाली व उर्दू अशा एकूण सात भारतीय भाषांचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.
अर्थात, आता इंटरनेट नसतांनाही कुणी या सात भाषांमध्ये अनुवादाची सुविधा वापरू शकणार आहेत. यासाठी गुगल ट्रान्सलेटच्या अॅपची ताजी आवृत्ती आणि ऑफलाईन युजसाठी असणार्या टुल्सचे पॅकेज डाऊनलोड करावे लागणार आहे. यासाठी सुमारे ३० मेगाबाईट इतका डाटा लागणार आहे. तथापि, एकदा का हे अपडेट इन्स्टॉल झाले की मग इंटरनेटविना अनुवाद करता येणार आहे. यात संबंधीत अपडेट इन्स्टॉल करतांनाच ते कोणत्या भाषेत वापरायचे आहे याची सेटींग करावी लागणार आहे.
दरम्यान, गुगल ट्रान्सलेटच्या ताज्या अपडेटमध्ये युजर्सला वर नमूद केलेल्या सात भारतीय भाषांसाठी कॅमेरा ट्रान्सलेटची सुविधादेखील देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत कुणीही युजर आपल्या स्मार्टफोनमधील कॅमेर्याच्या मदतीने कोणत्याही इमेजवरील मजकूर मराठी (तसेच अन्य सहापैकी एक) या भाषेत वाचू शकणार आहे. समजा एखाद्या फ्लेक्सवर इंग्रजीतून मजकूर लिहला आहे. आणि तो आपल्याला मराठीत वाचायसा असेल तर आपल्या गुगल ट्रान्सलेट अॅपमध्ये असणार्या कॅमेरा आयकॉनवर क्लिक करून संबंधीत फ्लेक्समधील मजकूरावर फोकस करावा. यानंतर संबंधीत इंग्रजी मजकूर आपल्याला मराठी (वा अन्य हव्या त्या) भाषेत वाचता येईल.
सध्या ही सुविधा फक्त इंग्रजी भाषेसाठीच वन-वे या पध्दतीत सादर करण्यात आली आहे. म्हणजेच सध्या तरी इंग्रजी भाषेतील मजकूर मराठीसह अन्य भारतीय भाषांमध्ये वापरता येईल. याच्या अगदी विरूध्द म्हणजे मराठीतला मजकूर या माध्यमातून सध्या तरी इंग्रजीत वाचण्याची सुविधा दिलेली नाही. तर दुसरीकडे गुगलने आपल्या गुगल असिस्टंट या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटची व्याप्ती अद्याप वाढवलेली नाही. यामुळे भारतीयांसाठी अद्याप याला फक्त हिंदी भाषेचाच सपोर्ट देण्यात आला आहे. तथापि, यातही लवकरच मराठीसह अन्य भाषांचा सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे.