Vi 5G Internet : 5G च्या रेसमध्ये वोडाफोन आयडिया मागे, कंपनीवर 13 हजार कोटीची थकबाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 06:52 PM2022-09-23T18:52:23+5:302022-09-23T18:53:22+5:30
Vodafone Idea 5G Internet : वोडाफोन आयडियावर तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांची 13,000 कोटींची थकबाकी आहे.
नवी दिल्ली: सर्वात आधी 5G सेवा देणासाठी दूरसंचार कंपन्यांमध्ये शर्यत सुरू आहे. जिओ (Jio) आणि एअरटेलने (Airtel) ने 5G सेवा सुरू करण्याबाबत आधीच माहिती दिली आहे. पण, या क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी व्होडाफोनआयडिया (Vodafone Idea) मागे पडताना दिसत आहे. कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कंपनीला तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांची 13,000 कोटी रुपयांहून अधिक थकबाकी भरावी लागणार आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दूरसंचार कंपन्यांना ऑक्टोबरमध्ये देशात 5G इंटरनेट सेवा सुरू करण्यास सांगितले आहे. सरकारने अनेक महिन्यांपूर्वी दूरसंचार कंपना जिओ, एअरटेल, व्होडाफोनआयडिया आणि अदानी ग्रुपला 5G इंटरनेट संबंधित अधिकार दिले आहेत. Jio आणि Airtel ने ऑक्टोबरमध्ये अनेक शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
Vodafone Idea साठी 5G इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या मार्गावर आर्थिक संकट येत आहे. 4G इंटरनेट सेवांसाठी उपकरणे पुरवणाऱ्या नोकियाचे व्होडाफोन आयडियावर 3,000 कोटींची थकित बाकी आहे. तर, इंटरनेट पायाभूत सुविधा विकसित करण्यात मदत करणारी स्वीडिश कंपनी एरिक्सनचेही 1,000 कोटी रुपये थकीत आहेत. तर, टॉवर कंपनी इंडस टॉवर्सकडे सुमारे 7,000 कोटी रुपये आणि अमेरिकन टॉवर कंपनी (ATC) 2,000 कोटी रुपये थकित आहेत.
सतत तोट्याचा सामना करत असलेल्या व्होडाफोन आयडियाला या परिस्थितीत 5जी इंटरनेट सेवा सुरू करणे कठीण जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. व्हेंडर्स 5G साठीच्या कामांसाठी आगाऊ पैसे देण्याची मागणी करत आहेत. वोडाफोन आयडिया 13,000 कोटींहून अधिकची थकबाकी भरणार असेल, तरच व्हेंडर्स 5G सेवांवर काम करण्यास सुरवात करतील. या कंपन्यांना पैसे देण्यासाठी व्होडाफोन आयडिया निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे.