Vi 5G in Pune: रॉकेटच जणू! व्होडाफोन आयडियाची पुण्यात टेस्टिंग; 3.7Gbps चा भन्नाट 5G स्पीड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 12:40 PM2022-08-17T12:40:31+5:302022-08-17T12:44:47+5:30
Vi 5G Service Soon: व्होडाफोनची युरोपमध्ये देखील ५जी सेवा आहे. परंतू, तिथे फोरजीच्या सिमवरच ही सेवा दिली जात आहे. 5G चा स्पीड मिळविण्यासाठी नव्या ५जी सिमची गरज नाही.
देशात अवघ्या काही दिवसांतच 5G सेवा सुरु होणार आहे. जिओने स्वातंत्र्यदिनी फाईव्ह जी लाँच करणार असल्याची हवा केली होती. पण एअरटेलने ऑगस्टच्या अखेरीस 5G सेवा लाँच करण्याची घोषणा केली आहे. बीएसएनएल या स्पर्धेत कुठेच नसली तरी तिसरी खासगी कंपनी व्होडाफोन-आयडियाने धमका करण्याचे ठरविले आहे.
व्हीआयने पुण्यात 5G च्या चाचण्या घेतल्या आहेत. यामुळे लवकरच व्होडाफोनही भारतात फाईव्ह जी लाँच करेल असे दिसत आहे. व्होडाफोनने ही सेवा कधीपर्यंत लाँच केली जाईल याची अधिकृत माहिती दिलेली नाहीय. मात्र, टेलिकॉम इंडस्ट्रीतील सुत्रांनुसार कंपनी याच महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्येच 5G सर्विस लाँच करण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरुवातीला अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे या १३ शहरांत केली जाणार आहे.
व्होडाफोनची युरोपमध्ये देखील ५जी सेवा आहे. परंतू, तिथे फोरजीच्या सिमवरच ही सेवा दिली जात आहे. 5G चा स्पीड मिळविण्यासाठी नव्या ५जी सिमची गरज नाही. म्हणजेच सध्याच्या व्हीआयच्या ४जी सिमवरच तुम्ही ५जी सेवेचा आनंद घेऊ शकणार आहात.
कंपनीने पुण्यात ट्रायल रन घेतले. Vi ने mmWave स्पेक्ट्रमवर 3.7Gbps चा पीक डेटा स्पीड मिळवला. गांधीनगरमधील 3.5 GHz बँड वापरून, Vi ने 5G नेटवर्कमध्ये 1.5 Gbps पर्यंतचा वेग मिळवला. 4G च्या तुलनेत 5G चा स्पीड खूप वेगवान असेल, असा दावा करण्यात आला आहे. हा सुरुवातीचा वेग असला तरी जेव्हा ग्राहक वाढतील तेव्हा तो कमी होईल व लोकांना थ्री जी, फोर जीच्या वेळी जसा अनुभव आला तसाच अनुभव येणार आहे.